महाराष्ट्र राज्याची आर्थिक, सामाजिक क्षेत्रात आघाडी - राज्यपाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2017

महाराष्ट्र राज्याची आर्थिक, सामाजिक क्षेत्रात आघाडी - राज्यपाल


मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतशील राज्य असून आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. ते आज राजभवन येथे महाराष्ट्र दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. राज्यपाल पूढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात मेक इन इंडिया अंतर्गत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक झाली असून राज्याच्या विकासाच्या दृष्टिने चांगली बाब आहे.

याच राजभवनच्या इमारतीत महाराष्ट्र या राज्याची निर्मिती झाली, या राज्याला गौरवशाली इतिहास आहे. येथे इतिहास तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, समाजसुधारक होवून गेले आहेत. येथे प्रत्येक भागाचे एक वेगळे वैशिष्ट आहे. येथील समाजाने विविध परंपरा जपल्या असून सांस्कृतिकदृष्टया समृद्ध राज्य आहे. प्रारंभी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा’ या गीताने करुन शेवटही ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताच्या ओळीने केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचाराने महाराष्ट्र घडत आहे. वेगाने पूढे जात आहे. या राज्यातील शेतकरी, युवक, कामगार सुखी झाला पाहिजे, युवकांसाठी मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली पाहिजे, यासाठी आम्ही कट्टीबद्ध आहोत असे सांगून शेवटी त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी राज्यपाल यांचे सचिव वेणू गोपाल रेड्डी यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर या दोघांनी महाराष्ट्र दिन सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ नगारा वाजवून केला. याच कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या दोन ग्रंथाचे प्रकाशन तसेच राजश्री शाहू महाराज ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. याच कार्यक्रमात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या डॉ.लोकेंद्र सिंग (वैद्यकीय सेवा), राणा कपूर (सीइओ येस बँक), सुधीर गाडगीळ (निवेदक), शांतीलाल मुथा (सामाजिक कार्य), प्रभात कोळी (जलतरण पट्टू), डॉ.अजय महाजन (वैद्यकीय सेवा), रुही पवार (यकृत दान करणारी युवती) यांचा मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास गीत आणि नृत्यातून सादर करण्यात आला.

या कार्यक्रमाला उद्योगमत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, विविध विभागाचे प्रधान सचिव, सचिव, विविध देशाचे राजदूत, राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad