मुंबई / प्रतिनिधी - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरेच्या हरित पट्ट्यातील ३३ हेक्टर जागा दिली जाणार आहे. या जागेवर चार हजार झाडांचा बळी देऊन कारशेड उभारले जाणार आहे. आरे हा हरित पट्टा असून मुंबईचे फुफ्फुस आहे. त्या जागेवरील आरक्षण बदलून झाडांची कत्तल करून कारशेड उभारल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याने सुधार समितीमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोध करेल अशी माहिती महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली.
नरिमन पॉइंट ते अंधेरी सिप्झपर्यंत धावणाऱ्या मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे वसाहतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात कारशेडसाठी जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरेच्या एकूण जागेपैकी ३३ हेक्टर जागा मेट्रो कारशेड, वर्कशॉप, वाणिज्य सी १ वापरासाठी आरक्षित करा असा प्रस्ताव नगर विकास विभागाने महापलिकडे पाठवला आहे. नगर विकास विभागाने केलेल्या सुचने प्रमाणे महानगर पालिकेने आरे मधील आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीसमोर सादर केला आहे. आरे मधील झाडे तोडण्याला काँग्रेसचा विरोध असणार आहे. आमचा हा विरोध सुधार समितीमध्ये दर्शवून आम्ही आपले भूमिका मांडणार असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.
नुकत्याच संपन्न झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे समान सदस्य निवडून आले आहेत. यामुळे सुधार समितीतही शिवसेना आणि भाजपाची सदस्य संख्या समान आहे. राज्य सरकार भाजपाचे असल्याने मेट्रो प्रकल्पासाठी लागणारी आरेची जागा मिळवून देण्यासाठी भाजपाचे सदस्य हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर आरे मधील झाडे तोडण्याला भाजपा वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्र्रवादी यांह्यासह सर्वच पक्षांचा विरोध असल्याने सुधार समितीच्या गुरुवारी ११ मे रोजी होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावावरून भाजपा आणि इतर पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळणार आहे.