मुंबई / प्रतिनिधी - स्वाइन फ्लूने राज्यभरात थैमान घातले असताना मुंबईतही या आजाराने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू मुळे मुंबईत तिसरा मृत्यू झाला आहे. २८ एप्रिलला वरळीतील एका दीड वर्षीय मुलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. तर १२ मे रोजी कुर्ला येथील ७२ वर्षीय महिलेलाही स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर चार दिवसांनी १६ मे रोजी सायन रुग्णालयात भांडुप टिळकनगर येथील ३० वर्षीय गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अलाहाबादची असणारी ही महिला एक महिन्यापूर्वी भांडुप येथे राहण्यास आली होती. ती सात महिन्यांची गर्भवती होती. तिला ब्रॉन्कायल अस्थमा झाल्याचे निदान झाले होते. शिवाय, तिला काही दिवसांपासून कफ, छातीत दुखणे, श्वसनात अडथळा आणि उलट्यांचाही त्रास होत होता. १३ मे रोजी सायंकाळी तिला सावित्रीबाई फुले मॅटर्निटी होममध्ये नेण्यात आले. तेथे तिला सायन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी ७.२० वाजता तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी १६ मे रोजी सकाळी ११ वाजता तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने भांडुप टिळकनगर परिसरातील ५२५ घरांतील २ हजार २६ व्यक्तींची चाचणी केली आहे. त्यापैकी ११ लोकांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंंबईत ३७ स्वाईन फ्लूचे रुग्ण -
२०१५ मध्ये स्वाईन फ्लूचे ३०२९ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ३० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. २०१६ मध्ये स्वाईन फ्लूचे केवळ तीनच रुग्ण सापडले होते. २०१७ या वर्षी जानेवारीच्या सुरूवातीपासून स्वाईन फ्लूनेे डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. २०१७ मध्ये मुंंबईत आतापर्यंत ३७ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. १ जानेवारी ते ३० एप्रिल २०१७ पर्यंत राज्यभरात ५०० हून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यात १९६ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, ही संख्या पुणे व नागपूरमध्ये सर्वाधिक आहे.
स्वाइन फ्लूमुळे घाबरण्याचे कारण नाही -
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, स्वाइन फ्लूमुळे घाबरण्याचे कारण नाही. स्वाइन फ्लू बरा होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाणे टाळा आणि गरज पडल्यास तोंडाला रुमाल बांधा. स्वाइन फ्लूवरील लसीकरण आणि औषधे उपलब्ध आहेत. त्यांचा डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करा. या साथीदरम्यान गर्भवती, रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांत गर्भवतींसाठी लसही उपलब्ध करून दिली जात आहे.