मुंबई - हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन स्थानकातील फलाट क्र. २ वरील बाकावर पहाटेच्या वेळी झोपलेल्या दर्शन दयाराम जाधव (२८) यांच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या व पॅण्टच्या खिशातून मोबाईल हिसकावून पळ काढणार्या दोन साखळीचोरांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. शाहरूख ताहीर खान (२0) आणि नूर इस्लाम जहाँगीर शेख ऊर्फबाटला (१७) या दोघांना अटक केली. यातील शाहरूख हा भाईंदर पश्चिम, नेहरू नगर येथील, तर नूर हा माहिम येथील नयानगर झोपडपट्टीत राहणारा आहे.
उरण कारंजा येथील चुनाभट्टी कॉलनीत राहणारे दर्शन जाधव हे सोमवारी पहाटे लोकलची वाट पाहात हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन स्थानकातील फलाट क्र. २ वरील बाकावर झोपी गेल्याची संधी साधत या दोघांनी त्यांच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या व मोबाईल चोरून नेला होता. या प्रकरणी दर्शन यांनी वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने या चोरांचा शोध सुरू केला होता. शिवाय त्यांनी यासाठी विशेष पथकही नेमले होते. त्यानुसार पो. हवा. सुधीर चौधरी, पो.ना. गुरू जाधव, अमित बनकर तपास करत असताना त्यांना या दोघांबाबत माहिती मिळाली. त्यावर पोलिसांनी या दोघांना माहिम येथून ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती वपोनि. आय. बी. सरोदे यांनी दिली आहे.