
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कुर्ला येथील मिठी नदीच्या सुशोभीकरणाचा प्रस्तावाला भाजपा सदस्यांच्या विरोधानंतरही शिवसेनेने मंजुर केला आहे. यामुळे कुर्ला येथील क्रांतिनगरपासून स्मशानभूमीपर्यंत मिठी नदीच्या बाजूला लवकरच उद्यान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका तीन कोटींचा खर्च करणार आहे.
मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या संपूर्ण नदीच्या किनाऱ्यावर उद्यान तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कुर्ल्यातील क्रांतिनगरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन कोटी 94 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. याविषयीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडला असता भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी मिठी नदीच्या बाजूला सुशोभीकरण केले जाणार आहे. मात्र मिठी नदीचे काय करणार ? कुर्ला विभागातील मिठी नदीमधील मलनिस्सारण वाहिन्या वळवण्यात आल्या आहेत का ? मिठी नदी ज्या ठिकाणी उगम पावते त्याच ठिकाणी एक आरएनसी प्लांट आहे. या प्लांटमधून नदीत काँक्रीट सोडले जाते. हा प्लांट पालिकेच्या जागेवर आहे. या प्लांटला कोणी परवानगी दिली ? उपस्थित करत मिठी नदीच्या बाजूला सुशोभीकरण करण्यापेक्षा नदीमधील पाण्याचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. नदीमधील पाणी शुद्ध नसेल तर लोक त्याठिकाणी येऊन काय पाहणार ? असे प्रश्न उपस्थित केले.
राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी नदीमधील पाणी अशुद्ध असल्याने मिठी नदी किनारी लोकांना आणून त्यांचे आरोग्य धोक्यात आणणार का असा प्रश्न उपस्थित करत नदीमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर देण्याची मागणी केली. भाजपचे सदस्य प्रभाकर शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापन या मिठीनदीवर अनेक वर्षे काम करत आहे तरीही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. या नदीवरील कामासाठी गेल्या ५ वर्षात एसडब्लूएम विभागाने किती खर्च केला ? नदीमधील गाळ काढताना सुशिभिकरण केल्याने अडचणी होणार नाहीत का ? तसे एसडब्लूडी विभागाला विश्वासात घेतले आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले. मिठी नदीवरील कामाबाबत सर्व माहिती मिळत नाही तो पर्यंत हा प्रस्ताव मंजूर करू नका अशी मागणी भाजपा सदस्यांनी केली. यावर अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी या कामासाठी डीपीडीसीचा फंड वापरला जात आहे. मुंबईत फुटपाथच्या रस्त्यांना बंदी आहे याठिकाणीही पेव्हर ब्लॉकपासून रस्ता बनवला जात नसून पुठपाथ बनवला जाणार आहे असे सांगितले. यावर भाजप सदस्यांनी जो पर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत प्रस्ताव मंजूर करू नका अशी मागणी लावून धरली मात्र भाजपाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
सांडपाण्यावर होणार प्रक्रिया -
मिठी नदीत येणाऱ्या सांडपाण्यावर तीन टप्प्यांत प्रक्रिया करण्यात येईल. यासाठी अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मिठी नदीच्या उगमापासून तीन किलोमीटर पर्यंतच्या सांडपाण्यावर पवई येथील पाणीपुरवठा प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येईल. साकीनाका येथील प्रक्रिया केंद्रात दररोज 44 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होईल. माहीमपासून धारावीपर्यंतच्या प्रवाहातील पाण्यावर वांद्रे येथे प्रक्रिया करण्यात येणार आहे.
उद्यानाजवळ कचराकुंडी -
घरातील कचरा नागरिक नाल्यात भिरकावतात. मिठी नदीत असा कचरा टाकला जाऊ नये, यासाठी किनाऱ्याच्या बाजूला तयार केलेल्या उद्यानाजवळ ठराविक अंतरावर कचराकुंड्या ठेवण्यात येतील. पदपथ तयार करणे, हिरवळ तयार करणे; तसेच हे काम पूर्ण झाल्यावर वर्षभर उद्यानाची देखभाल ठेवण्याची जबाबदारीही कंत्राटदाराची असेल.
