मुंबई - राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी घाटकोपरमध्ये अनधिकृतरीत्या बसविण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविले. तीन महिन्यांपूर्वी कोणतीही परवानगी न घेता १५ फूट उंचीचे पुतळे बसविण्यात आले होते. हे पुतळे हटविताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
घाटकोपर वर्सोवा लिंक रोडवरील आंबेडकर चौक, असल्फा आणि विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षानगरमध्ये अनधिकृतरीत्या बसविण्यात आले होते. महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी दोन पुतळे काढण्यात आले असून, उर्वरित एक पुतळा लवकर काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. घाटकोपर परिसरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी सुमारे तीन महिन्यांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभे केले होते. त्यासाठी कसलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. मात्र, अनधिकृत पुतळ्यांमुळे त्यांच्या सुरक्षेबाबत कसलीही खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. एका बाबासाहेबांचा पुतळा तर चक्क एका बियर बारच्या समोर बसवण्यात आला होता त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याबाबत तीव्र आंदोलन केले होते. स्थानिकांची नाराजी लक्षात घेऊन पोलिसांनी हे पुतळे हटविण्याचा निर्णय घेतला.