मुंबई / प्रतिनिधी - सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सफाई कामगारांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे दादर पश्चिम येथील वनमाळी सभागृहात सायंकाळी पाच वाजता आयोजन केले आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे मार्गदर्शन करणार असल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, सफाई कामगार संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार यांनी सांगितले.
सन १९८६ ते २००७ पर्यंतचा घरांचा बॅकलॉग शासन आदेशानुसार भरून काढणे, पालिकेत २००९ मध्ये झालेल्या भरतीतील उर्वरित प्रतीक्षा यादीतील कामगारांना मुंबई महापालिकेत सामावून घेणे, ठेकेदारी प्रथा बंद करण्यात यावी, ज्या सफाई कामगारांना घरे नाहीत त्यांना १९८८ च्या शासनाच्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षित सदनिकांचे वाटप करण्यात यावे. सफाई कामगारांना लाड पागे समितीनुसार जात प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तसा शासन आदेश काढण्यात यावा. सफाई कामगारांच्या कालबाह्य होणाऱ्या शासन आदेशावर हायपावर कमिटी बसविण्यात यावी, सफाई कामगारांची त्वरित भरती करण्यात यावी, खाजगी क्षेत्रात इमारती चाळींमध्ये काम करणाऱ्या सर्व सफाई कामगारांना त्यांच्या संरक्षणासाठी माथाडी कामगार बोर्ड धर्तीवर सफाई कामगार बोर्ड बनविण्यात यावे, तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळात सफाई कामगारांच्या कर्ज प्रकरणात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्याची सी बी आय चौकशी करण्यात यावी व कर्ज प्रकरणातील सफाई कामगारांना त्यांच्या स्वयंरोजगारासाठी केंद्र सरकारला त्वरित हमीपत्र देण्यात यावे या आपल्या प्रमुख मागण्या असल्याचे परमार यांनी सांगितले.