अमली पदार्थाचे नेटवर्क चालवणाऱ्या आझमीला अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अमली पदार्थाचे नेटवर्क चालवणाऱ्या आझमीला अटक

Share This

मुंबई - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केला. मुंबईतून अमली पदार्थाचे नेटवर्क चालवणाऱ्या अबू असलम कासीम आझमी उर्फ असलम याला पोलिसांनी मंगळवारी (ता. 6) सांताक्रूझमधील हॉटेलमधून अटक केली. 40 कोटींचे पाच किलो पार्टी ड्रग्ज (एमडीएम) जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी अमित अग्रवाल, अवधेश कुमार, चंदन रायला यांनाही अटक केली.


वाकोल्याच्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये कासिम लपल्याची माहिती दिल्लीच्या स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त संजीव यादव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या हॉटेलमधून कासिमला अटक केली. या ठिकाणी तो त्याच्या मैत्रिणीसोबत आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे वाकोला पोलिसांकडून सांगण्यात आले. कासिम हा मुंबई समाजवादी पक्षाचे नेते अबू असिम आझमी यांचा भाचा असून, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका ठिकाणी धाड टाकत अमलीपदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. ज्याची किंमत सुमारे चाळीस कोटी रुपये आहे. या प्रकरणी तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची चौकशी सुरू केली. हे अमलीपदार्थ कासिमनेच त्यांना पुरविले असून, अमलीपदार्थांचा तो देशातील मोठा तस्कर असल्याचेही ते म्हणाले. तेव्हापासून दिल्ली पोलिसांची कासिमवर नजर होती. समुद्रमार्गे अमलीपदार्थांची तस्करी तो करत होता. दुबईमध्ये असलेल्या कैलाश राजपूत नामक इसमाचेही नाव या प्रकरणी पुढे आले आहे. राजपूत दुबईतून अमलीपदार्थ कासिमला पुरवत होता. कासिमनंतर मुंबई, दिल्ली तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये त्याचा पुरवठा करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages