मुंबई - विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानातून घेतलेल्या दारूच्या बाटलीत लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्याला बुधवारी (ता. 7) हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सहार विमानतळावर अटक केली. विपुल कुमार नथुभाई असे त्याचे नाव असून तो सुरतमधील हिरे व्यापारी आहे. "एनआययू'ने त्याच्याकडून 95 लाखांचे सोने जप्त केले. अशा प्रकारच्या तस्करीची ही दुसरी घटना आहे.
सुरतचा विपुल नथुबाई सोमवारी विमानाने दुबईला गेला होता. एआययूच्या अधिकाऱ्यांना चकवा देण्याकरिता विपुलने सहार विमानतळावरून ड्युटी फ्री दुकानातून "जीनबीन' ही महागडी दारू खरेदी केली. विशेष म्हणजे, ड्युटी फ्री दुकानातून घेतलेल्या वस्तूची इतर विमानतळावर फारशी तपासणी होत नाही, हे दुबईतील तस्कराला माहीत होते. मंगळवारी (ता. 6) विपुलला दुबईतील तस्कराने दारूची बाटली दिली. त्या दोन्ही बाटल्या घेऊन विपुल बुधवारी पहाटे सहार विमानतळावर आला. एआययूच्या अधिकाऱ्यांना त्याची हालचाल संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्या वेळी दारूच्या दोन बाटल्या सापडल्या. त्यांचे झाकण उघडल्यानंतर त्यात 95 लाखांचे सोने आढळले. अधिकाऱ्यांनी विपुलची कसून चौकशी केली. तस्करीतील सोने घेऊन तो वांद्रे येथे एका व्यक्तीला देणार होता. त्याबदल्यात त्याला कमिशन मिळणार होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.