मुंबई / प्रतिनिधी - गोरेगावमध्ये एका तरूणीने आपल्या प्रियकरावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात ओमसिंह सोलंकी हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीरा शर्मा (26) असे आरोपी तरूणीचे नाव असून ती नालासोपारा येथे राहणारी आहे.
ओमसिंह सोलंकी याचे मीरा शर्मासोबत प्रेमसंबध होते. मात्र अलिकडच्या काळात त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. ओमसिंह मीराला भेटण्याचे तसेच तिच्यासोबत बोलण्याचे टाळत असल्याने मीराला राग आला. या रागातूनच तिने गुरुवारी संध्याकाळी एम.जी. रोड परिसरात ओमसिंहला गाठून त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दोघांमधील भांडण वाढल्यावर मीराने ओमसिंहवर अॅसिड टाकले आणि ती तेथून पसार झाली. अॅसिड हल्ल्यात ओमसिंहच्या चेहऱ्याला तसेच डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे, त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मीरा सध्या फरार असून गोरेगाव पोलीस तिचा शोध घेत आहेत.