मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त विजय सिंघल यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली असून सिंघल यांनी आज (दिनांक ०७.०६.२०१७) सकाळी या पदाचा पदभार स्वीकारला.
सिंघल हे १९९७ च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असून त्यांचा जन्म ३० मे, १९७१ रोजी झाला आहे.त्यांनी बी.ई. (सिव्हील इंजिनिअरिंग) मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले असून एम.टेक (बिल्डींग, सायन्स आणि कन्स्ट्रक्शन मेनेजमेंट) ही पदवी संपादन केली आहे.
सिंघल यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांमधील कामाचा सुमारे २० वर्षांचा अनुभव असून त्यांनी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त ही पदे समर्थपणे सांभाळली आहेत. जळगांव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या 'नंदी संयोजन परियोजना' संदर्भात विशेष कार्य केल्याबद्दल सिंघल यांना 'प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबाबतचा पंतप्रधान पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.
सिंघल यांच्यावर पूर्व उपनगरे विभागाची तसेच प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतुक), प्रमुख अभियंता (पूल), प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या), प्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन (क्षेपणभूमी संबंधातील प्रकल्प वगळून), माहिती व तंत्रज्ञान, उद्याने व सुरक्षा विभाग, व्यवसाय विकास विभाग, निवडणूक विभाग, स्मार्ट सिटीविषयक कामे,संगणकीकरणविषयक कामे, गणेशोत्सव संबंधित प्रकरणे, नाटय़गृहे, जलतरण तलाव, राजीव आवास योजनेसंदर्भातील प्रकरणे आदी महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.