22 ठिकाणी झाडांची पडझड तर 7 ठिकाणी शॉर्टसर्किट -
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईतील नालेसफाई चांगली झाली असल्याने मुंबईत पावसाळयात पाणी साचणार नाही असा दावा महापालिका प्रशासनाने केला असतानाच मुंबईत गुरुवारी (8 जुन) पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे तब्बल 14 ठिकाणी पाणी साचल्याने पालिका प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे. मुंबईत गुरुवारी कुलाबा येथे 24 मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे 26.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसात पूर्व उपनगरातील गोवंडी, विक्रोळी कन्नमवार नगर, पार्कसाईट, तुंगा गाव पवई, घाटकोपर बर्वेनगर या पाच तर पश्चिम उपनगरातील जोगेश्वरीतील सुभाषनगर, मालाड येथील डिमॉन्टी लेन, मालवणी, येडू पटेल कंपाऊंड, जरीमरी कॉटेज, अंधेरीतील पारसीवाडा, जेव्हीएलआर, दहिसरमधील आंनद प्लाझा, बोरीवलीतील श्रीकृष्ण नगर अशा एकूण 14 ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईत अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी झाली असली तरी रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. मुंबईत शहरात 2, पूर्व उपनगरात 1, पश्चिम उपनगरात 4 अश्या सात ठिकाणी 7 शॉर्टसर्किटच्या तर शहरात 8, पूर्व उपनगरात 7, व पश्चिम उपनगरात 7 अश्या 22 ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. या पडझडीत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत नाही. येत्या 24 तासात मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता वेध शाळेने वर्तवली आहे.