मुंबई - सांताक्रुझ चेंबूर जोडरस्त्यावर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित जिने बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. एका वर्षात तब्बल १८ अपघात होऊन पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. अपघातामुळे जीव गमावल्यानंतर अनेक वेळा उग्र आंदोलने झाली आहेत. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी होणार्या स्वयंचलित सरकत्या जिन्यांमुळे नागरिकांची जीवघेण्या अपघातापासून सुटका होणार आहे. त्यामुळे जिवघेणे क्रासिंग बंद होणार आहे. मात्र मुंबईत अनेक पादचारी पूल आहेत, त्यांनाही अशा प्रकारचे स्वयंचलित जिने बसवण्यात यावेत अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.
सांताक्रुज- चेंबूर जोड रस्ता एमएमआरडीएने बांधला आहे. कुर्ला पश्चिम येथे असलेला हा पूल एमएमआरडीएने मुंबई महापालिकेला 2015 रोजी हस्तांतरीत करण्यात आला आहे. सांताक्रुझ- चेंबूर जोडरस्ता 45.70 मीटर रुंद असल्यामुळे तसेच या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण मोठे असल्याने बुध्द कॉलनी येथे पादचारी पूल बांधण्यात आला आहे. मात्र पादचारी पुलांची उंची जास्त असल्यामुळे व पूल नागमोडी वळणाचा असल्याने लोक पादचारी पुलाचा वापर टाऴतात व दुभाजक ओलांडून रस्ता पार करतात. सदर पादचारी पुलाचा जास्तीच जास्त वापर व्हावा व अपघात होऊ नयेत यासाठी या पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला वर चढण्याठी स्वयंचलित जिने बसवण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. याासाठी दोन कोटी 62 लाख रुपयाचा खर्च केला जाणार आहे. शुक्रवारी स्थायी समितीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
मात्र मुंबईतील इतर पुलांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रशासनाने अशा पुलांकडेही लक्ष द्यावे व अशा पुलांनाही स्वयंचलित जिने लावावेत अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी केली. नगरसेवक संजय घाडी यांनी काही पुलांच्या बाजूला गर्दुल्यांचा वावर असतो, पूलाच्या बाजूला अतिक्रमण असल्याने अनेकांना समस्या येतात. सर्व पुलांना स्वयंचलित जिने बसवल्यास वाहतुकीची समस्याही सुटेल याकडे बहुतांशी नगरसेवकांनी लक्ष वेधले. वरळी नाका येथील पादचारी पुलाची अवस्था दयनीय असून आयुक्तांनी येथे भेट देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी केली.
राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर रमाबाई नगर, कामराज नगर येथे पादचारी पूल नसल्याने लोकांना भुयारी मार्गातून ये जा करावी लागते. या भुयारी मार्गात योग्य प्रमाणात हवा खेळती नसल्याने येथील लोकांना आपले आरोग्य धोक्यात घालून भुयाराचा वापर करावा लागतो. रमाबाई व कामराज नगरमध्ये अनेकांकडे वाहने आहेत. हि वाहने घाटकोपर डेपो किंवा छेडा नगर येथून घाटकोपर स्थानकाकडे घेऊन जावी लागतात. यामुळे इंधन वाया जात आहे. यासाठी येथील लोकांना वाहनांसाठी एक भुयारी मार्ग बनवावा अशी मागणी केली. दरम्यान अशा पुलांची माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.