मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबई गोवंडी येथील रफिक नगर नाल्याच्या रुंदीकरण खोलीकरण व संरक्षण भिंतीचे काम सुरु आहे. या कामात ध्वनी प्रदूषण होत असल्याने आर. ई. इंफ्रा या कंत्राटदारावर कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा असे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.
रफिक नगर नाल्यात २०१४ पासून रुंदीकरण खोलीकरण व संरक्षण भिंतीचे काम सुरु आहे. हे काम आर. ई. इंफ्रा हि कंपनी करत असून काळ्या यादीतील या कंपनीच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी केला आहे. तश्या लेखी तक्रारी जाहिद शेख यांनी मुंबई महापालिकेचे एम पूर्व विभाग, पालिका आयुक्त, वन विभाग, प्रदूषण विभाग, कोस्टल विभाग इत्यादी संबंधित सरकारी कार्यालयांकडे केल्या आहेत. रफिक नगर नाल्यात सुरु असलेल्या खोदकामामुळे आजूबाजूच्या घरांना तडे गेले आहेत. फायलिंगच्या दिवसा व रात्री अपरात्री सुरु असलेल्या कामामुळे व इतर मशीनच्या कामामुळे स्थानिक रहिवाश्याना ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पालिकेकडे व पोलिसांकडे तक्रारी केल्यावर या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतू याची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेतली असून महापालिका आयुक्त अजोय मेहता व सहाय्यक आयुक्त एम पूर्व विभाग यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या नागरी सनदेची आठवण करून देण्यात आली आहे. सदर काम हे नागरी भागात येत असल्याने मशीनचे मालक व कंत्राटदारावर पालिकेने कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा असे उप प्रादेशिक अधिकारी सा. वी. आवटी यांनी पत्रात म्हटले आहे.