महापालिकेचे मुजोर अधिकारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 June 2017

महापालिकेचे मुजोर अधिकारी


मुंबई महानगरपालिका प्रशासनाला गेंड्याच्या कातडीचे आहेत, माजलेले आहेत असेही बोलले जाते याचा प्रत्यय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ असलेल्या मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनाही येऊ लागला आहे. पावसाळा तोंडावर असताना मुंबईत नालेसफाई, नादुरुस्त रस्ते, आणि पावसाळयात पाणी साचणे, रस्त्यावरील खड्डे या दरवर्षी घडणाऱ्या घटना. यासर्व सोयी सुविधा देण्यास पालिका अधिकारी फेल ठरत आहेत. तरीही गिरे तोभी मेरी तंगडी उपर या म्हणी प्रमाणे असे काहीच नाही असे सांगून आपल्याच अकार्यक्षमतेवर पांघरून घालण्याचे काम अधिकारी करत आहेत.

मुंबईत नुकतीच पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली. या नालेसफाई दरम्यान पालिकेच्या एसडब्लूडी विभागाचे प्रमुख सुट्टीवर गेले होते. पालिकेने नालेसफाई झाल्याचा दावा केला, सत्ताधारी शिवसेनेने नालेसफाईची पाहणी केल्यावर पक्षप्रमुखांनी नालेसफाई चांगली झाल्याचे प्रमाणपत्र दिले असताना खुद्द महापौरांनी आपल्या नालेसफाई दौऱ्यामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांनी नालेसफाईची पाहणी करत हा दावा फोल असल्याचे उघड केले आहे. नालेसफाई अर्धा जून महिना संपला तरी आजही सुरु आहे.

असे असताना मान्सूनपूर्व पावसात मुंबईत व विशेष करून पश्चिम उपनगरात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात या प्रमाणात आणखी वाढ होणार आहे. मुंबईत 8 जुन रोजी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे तब्बल 14 ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. १२ जून रोजी पडलेल्या पावसात तब्बल ४१ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईमधील शहर विभागात हिंदमाता, सायन, किंग सर्कल, माटुंगा, दादर, वरळी, शिवाजी पार्क, अँटॉप हिल, परेल, धारावी, वडाळा, पूर्व उपनगरात गोवंडी, चेंबूर, देवनार कॉलनी तर पश्चिम उपनगरात मालाड, गोरेगांव, अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली, कांदिवली, बांद्रा, सांताक्रूझ या ठिकाणी पाणी तुंबले होते.

इतक्या ठिकाणी पाणी तुंबल्याने पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी एसडब्लूडीचे प्रमुख लक्ष्मण व्हटकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पाणी तुंबण्याच्या घटनेची खुद्द पालिका आयुक्त दाखल घेत असताना एसडब्लूडीच्या अधिकारी मात्र एक फूट पाणी तुंबणे म्हणजे पाणी तुंबणे बोलतात का? पाणी तुंबले असले तर त्यांचे फोटो काढून आम्हाला दाखवा असे उर्मट उत्तरे मीडियाला देत आहेत. महापालिकेच्या आपत्कालीन विभागात मुंबईमधील सर्व विभागातील नोंदी आणि नागरिकांच्या तक्रारीवरून दरदिवशी पावसाचा अहवाल तयार होतो या अहवालात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले असताना असे मानायलाच अधिकारी तयार नाहीत.

असाच प्रकार पालिकेच्या आरोग्य विभागात सुरु आहे. मुंबईतून स्वाईन फ्लू गेला असे बोलले जात असताना पुन्हा स्वाईन फ्लू आजार आला आहे. मुंबईत उन्हाळ्यात अचानक पडत असलेला पाऊस यामुळे मे महिन्यात ४४१५ तापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात तापाच्या ४१७१ रुग्णांची नोंद झाली होती. लेप्टोस्पायरेसिसचे मे २०१६ मध्ये २ रुग्ण आढळले होते यावर्षी मे महिन्यात लेप्टोस्पायरेसिसचे १० रुग्ण आढळले आहेत. मे २०१६ मध्ये डेंग्यूचे २७ रुग्ण आढळले होते यावर्षी यात वाढ झाली असून मे महिन्यात डेंग्यूचे ३१ रुग्ण आढळले आहेत. मे २०१६ मध्ये स्वाईन फ्लूचा १ रुग्ण आढळला होता यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून मे महिन्यात स्वाईन फ्लूचे ५० रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मे २०१६ मध्ये लेप्टोस्पायरेसिसचे २७ संशयित रुग्ण आढळले होते त्यात वाढ होऊन यावर्षी मे महिन्यात लेप्टोस्पायरेसिसच्या ६६ संशयीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर मे २०१६ मध्ये डेंग्यूचे १२९ संशयित रुग्ण होते त्यात यावर्षी वाढ होऊन मे महिन्यात डेंग्यूच्या १५४ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत मे महिन्यात ताप, लेप्टोस्पायरेसिस व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असताना ग्यास्ट्रो, हेपेटायसिसच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मे २०१६ मध्ये ग्यास्ट्रोचे ९२० रुग्णांची नोंद झाली होती ही संख्या यावर्षी कमी झाली आहे. मे महिन्यात ग्यास्ट्रोच्या ८४७ रुग्णांची नोंद झाली आहे. मे २०१६ मध्ये हेपेटायसिसच्या १३५ रुग्णांची नोंद झाली होती यात यावर्षी घाट होऊन यावर्षी मे महिन्यात हेपेटायसिसच्या १०६ रुग्णांची नोंद झाली आहे. मे २०१६ मध्ये कॉलराचे २ रूगन आढळले होते या वर्षी कॉलराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच मागील वर्षी व या वर्षी मे महिन्यात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेली हि आकडेवारी फक्त महापालिकेच्या रुग्णालयात नोंद झालेल्या रुग्णांची आहे. इतर खाजगी रुग्णालये व दवाखान्यात या आजारांचे रुग्ण किती याची आकडेवारी या अहवालात नोंद नाही. यामुळे मुंबईत विविध आजारांच्या रुग्णांची संख्या यापेक्षा मोठी असल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईत जानेवारी ते मे २०१७ या कालावधीत स्वाईन फ्लूने ३ जणांचामृत्यू झाला आहे. मुंबईकरांच्या आरोग्याशी निगडित असलेला पालिकेचा आरोग्य विभाग हि आकडेवारी प्रसिद्ध करत असला तरी मुंबईत आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे प्रमाण या विभागाला मेनी नाही. आजाराने एखादा मृत्यू झाला कि याची खातर जमा करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाशी पत्रकार संपर्क करतात. आजारांचे प्राण कमी झाले कि वाढले असे विचारून नागरिकांना अचूक बातम्या देणे हा पत्रकारांचा प्रयत्न असतो. आरोग्य विभागाचे अधीकारी मात्र आम्ही तुम्हाला आकडेवारीच देत बसायचे का ? आम्हाला इतर कामे नाहीत का ? आम्ही बनवू तेव्हाच आकडेवारी मीडियाला देऊ, आकडेवारीत जे आकडे आहेत त्यावरून आजारांची संख्या वाढली म्हणतात का ? अशी उद्धट उत्तरे देतात.

मुंबई महानगरपालिकेच्या अनेक विभागात असेच प्रकार सुरु आहेत. जेथे पालिकेचे आयुक्त स्वतः मीडियाच्या समोर यायला टाळतात त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याकडून वेगळी अपेक्षा ठेवणे चूक आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रत्येक बातमीला बाईट लागतो. इलेक्ट्रॉनिक मीडियाला बाईट देण्यास कोणीही तयार नसते यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियामधील पत्रकारांची अवस्था इतर मीडिया पेक्षा वाईट आहे. पालिका प्रशासनाकडून सुरु असलेल्या अश्या प्रकारांमुळे मीडियामधून नागरिकांना चुकीची माहिती जाण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेचीच बदनामी होणार आहे. याची दखल पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घ्यायला हवी.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

Post Bottom Ad