मुंबई दि. 10 June 2017 - बालकांचे लैंगिक शोषण, बालकामगार अशा विविध बाल समस्यांसाठी समाजात झगडणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आज शिवसेनेने सन्मान केला. राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी दिंडोशीतील संतोष शिंदे यांची निवड झाली. शिवसेना आमदार, विभाग प्रमुख सुनील प्रभु यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
दिंडोशी येथील नागरी निवारा संकुलात राहणारे संतोष शिंदे गेली २५ वर्षे बालहक्क व बालविकास क्षेत्रात काम करीत आहेत. तसेच महिला व बालविकास विभागातील बालविकास धोरण तयार करणे, एकात्मिक बालसंरक्षण योजनेच्या अंमल बजावणीत मार्गदर्शन करणे, बालकल्याण समिती सदस्यांना प्रशिक्षण देणे अशा अनेक कामांमध्ये ते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. या शिवाय युनिसेफ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेसोबत ते मुलांसाठी काम करीत आहेत. 'बालसंरक्षण - एक संकलन' व 'बालव्यापार' अशी दोन पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक कामाचा अनुभव पाहता महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज शिवसेना आमदार सुनील प्रभु यांनी नागरी निवारा येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन गौरव केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, शाखा प्रमुख संदीप जाधव, उपशाखा प्रमुख लहू देसाई, नागेश मोरे व शिवसैनिकांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.