मुंबई, दि. 5 June 2017 - आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांना सक्षम करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जीवन कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या ठराविक वस्तूंसाठीची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या प्रशिक्षणांतर्गत आरोग्य, पोषण, पाणी, स्वच्छता, हायजीन व जीवन कौशल्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 30 राज्यस्तरीय मास्टर प्रशिक्षक अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र, आरोग्य व कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्र आणि स्वयंसेवी संस्थांमधील व्यक्ती यांच्यामधून निवडण्यात येणार आहेत. या मास्टर प्रशिक्षकांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, नियुक्त प्रशिक्षकांकडून प्रत्येक आश्रमशाळेतून व एकलव्य निवासी शाळेमधून निवडलेल्या सहा कर्मचाऱ्यांना पुरुष अधीक्षक, स्त्री अधीक्षिका, प्रत्येकी दोन पुरुष व महिला शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा पहिला टप्पा १२ जून २०१७ पासून सुरु करण्यात येत असून यात ५४३ शासकीय आश्रमशाळांमधील ३,२५८ शिक्षक आणि अधीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेले शिक्षक ,अधीक्षक हे प्रत्येक आठवड्यात प्रशिक्षणसत्र आयोजित करून इयत्ता सहावी ते बारावी मधील किशोरवयीन मुलामुलींना प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार व सूचनांनुसार त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहे.
सवरा पुढे म्हणाले की, आदिवासींना सक्षम करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आज आदिवासी विभागामार्फत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे, मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था,नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि उर्वी अशोक पिरॅमल फांऊडेशन यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. अशोक पिरॅमल फांऊडेशन यांच्या सहाय्याने शहापूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई अंतर्गत भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आदिवासी विकासाशी संबंधित राबविण्यात येत असलेल्या योजनांचे कार्यान्वयन, संनियंत्रण, मूल्यमापन, आदिवासी आश्रमशाळांचे सक्षमीकरण करणे इ. बाबींचा सर्वांगीण अभ्यास करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणारे यांच्या अंतर्गत आदिवासींच्या विकासाशी संबंधित विविध बाबींसाठी विचार गट म्हनून काम पाहण्यासाठी आदिवासी संशोधन केंद्रे निर्माण केली जाणार आहेत.तसेच आदिवासी क्षेत्रामध्ये गणित व विज्ञानाचा प्रसार करणे ,बेरोजगार आदिवासी युवकांना कौशल्य विकास व स्वयं रोजगराचे प्रशिक्षण निर्माण करून देणे असे विविध प्रकल्प या विद्यापीठामार्फत राबविण्यात येणार आहे.
मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्थेंतर्गत राज्यातील आदिवासी विकासाशी संबंधित विविध बाबींचा तुलनात्मक अभ्यास करून संशोधनात्मक प्रकल्प राबविण्यात येणार आहे, हा प्रकल्प आदिवासी विकास महामंडळ ,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व इतर नामांकित संस्था किवा संघटना आणि तज्ञ यांच्या मार्फत हाती घेण्यात येणार आहे.
शासकीय आश्राम शाळांमध्ये आजारपणामुळे होणारे विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या अंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये १४ व रत्नागिरी जिल्ह्यात २ अशा एकूण १६ शासकीय आश्रमशाळांमध्ये उर्वी अशोक पिरॅमल फांऊडेशन यांच्या सहाय्याने मोबाईल हेल्थ युनिटद्वारे शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज अंतर्गत स्वच्छ आश्रमशाळा अभियान हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सामाजिक उत्तरदायीत्व कार्यक्रमांतर्गत सर्व आश्रमशाळांमध्ये पिण्यायोग्य पुरेसे पाणी,शौचालये, स्नानगृह, युरिनल व हायजीन आदी सुविधांचे नियोजन करून देण्यात येणार आहे.