बेस्टचा कृती आराखडा बेस्ट समितीने फेटाळला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टचा कृती आराखडा बेस्ट समितीने फेटाळला

Share This
मुंबई / प्रतिनिधी - बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात असून बेस्टला आर्थिक मदत मिळावी म्हणून पालिकेकडे एक हजार कोटीची मागणी करण्यात आली आहे. बेस्टला हवी असलेली मदत करण्यासाठी पालिकेने बेस्टला कृती आराखडा बनवण्यास सांगितले आहे. या आराखड्या मधील शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचे डीए आणि इतर सुविधा कमी केला जाणार असल्याने त्याला कर्मचाऱ्यांचा व युनियनचाही विरोध होता. यामुळे कृती आराखड्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने फेटाळला.


बेस्टवर २१०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. पालिकेने बेस्टला आधीच १६०० कोटी रुपये १० टक्के व्याजाने कर्ज दिले आहे. बेस्टने महापालिकेकडून पुन्हा १००० कोटी रुपयांची मागणी केल्याने बेस्टला आर्थिक मदत देण्यासाठी पालिका आयुक्तांनी कृती आराखडा बनवण्यास सांगितले होते. या आराखड्याच्या माध्यमातून बेस्ट कामगार - कर्मचाऱ्यांवर विविध भत्त्यांमधील कपातीवर विशेष भर देण्यात आला असून यामध्ये अनेक भत्ते गोठण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच बसचे मार्ग बंद करणे, प्रवासी भाडे वाढवण्याची शिफारस या आराखड्यात करण्यात आली आहे. सदर कृती आराखड्याचा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये आला असता भाजपाचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी हा कृती आराखडा १००० कोटी रुपये मिळवण्यासाठी केला आहे का ? बेस्टला असा प्रस्ताव बनवायला भाग पाडले गेले आहे का ? कामगार कायदे धाब्यावर बसवून करार मोडून प्रशासन एकतर्फी निर्णय घेत असल्याचा निषेध केला.

बेस्ट डबघाईला आली आहे त्याला फक्त कर्मचारी जबाबदार असल्याचे या आराखड्यात दाखवण्यात आले असले तरी त्याला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप गणाचार्य यांनी केला. बेस्टमध्ये गेल्या १० वर्षात कैझन, केएलजी, बसपास योजना, ट्रायम्याक्स, वर्क्स कंपनीचा घोटाळा झाला आहे. वर्क्स कंपनीमुळे बेस्टचे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे असे गणाचार्य यांनी सांगितले. बेस्टच्या बजेटला पालिका आणि स्थायी समिती मंजुरी देत नाही मात्र या बजेट बरोबर पाठवलेल्या आस्थापना अनुसूचीला मात्र पालिकेने मंजुरी दिली आहे. यामुळे पालिकेत बसलेल्या लोकांची पातळी घासली असल्याची टिका गणाचार्य यांनी केली. शिवसेनेची नाईट लाईफची संकल्पना असताना बेस्ट मात्र रात्री १० ते सकाळी ६ या वेळात बेस्ट बस बंद ठेवणार आहे. नाईट लाईफचा आनंद घेणाऱ्या लोकांना रात्रीची बस नको का असा टोला गणाचार्य यांनी यावेळी लगावत हा कृती आराखड्याचा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली.

गणाचार्य यांच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेनेचे बेस्ट समिती सदस्य अनिल पाटणकर, राजेश कुसळे, प्रवीण शिंदे यांनी बेस्ट चालवायची आहे कि बंद करायची आहे ? असा प्रश्न उपस्थित केला. बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांकडूनही सूचना मागवण्याची व बेस्टचे कमी अंतराचे दर ६ रुपये करण्याची मागणी केली. यावर बेस्ट महाव्यवस्थापक सुरेन्द्र बागडे यांनी कर्मचाऱ्यांचे भत्ते बेस्ट पुन्हा नफ्यात आल्यावर चालू करू असे आश्वासन देत कृती आराखडा मंजूर करण्याची मागणी केली. यावर कृती आराखड्याच्या प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत, बेस्टच्या माजी अध्यक्षांनीही हा कृती आराखडा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची नाईट लाईफची संकल्पना असल्याने रात्रीच्या वेळी बस बंद ठेवणे योग्य ठरणारे नाही. बेस्टच्या कृती आराखड्यात काय असावे यासाठी बेस्ट समिती सदस्यांशी चर्चा करावी, कर्मचाऱ्यांकडूनही सूचना मागवाव्यात व नव्याने आराखडा बनवावा असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी प्रशासनाला देत कृती आराखड्याचा प्रस्ताव फेटाळला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages