मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईत अनेक ठिकाणी पावसापासून वाचण्यासाठी शेड बांधण्यात येतात. पावसाळ्यात परवानगी देवून ही पावसाळ्यानंतर हे पावसाळी शेड काढले जात नाहीत. यामुळे मागील वर्षी शेड न काढणाऱ्यांची पालिकेने यादी तयार केली असून त्यांना यावर्षी परवानगी नाकरण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरवर्षी पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक हॉटेल्स, दुकाने, कार्यालये, घरे अशा विविध आस्थापना तात्पुरत्या शेड्स उभ्या केल्या जातात. त्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयांकडून रीतसर परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना संबंधितांनी हे शेड्स पावसाळा संपल्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत काढून टाकणे बंधनकारक केले आहे. तरीही काही ठिकाणी या शेड्स तशाच उभ्या असतात. पालिकेने याची गंभीर दखल घेतली असून ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत पावसाळी शेड्स काढून न टाकणा-या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच या वर्षीपासून तात्पुरत्या शेड्ससाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेऊन त्यात ज्यांना परवानग्या दिल्या आहेत, त्यांची नावे आणि इतर तपशीलाची नोंद केली जाणार आहे. ही जबाबदारी इमारत व कारखाने खात्यातील संबंधित 'बीट अधिकारी' यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी विभागात तात्पुरत्या पावसाळी शेड्ससाठी परवानगी दिलेल्या आस्थापनांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत शेड्स काढली आहेत की नाहीत याची पाहणी करावी. ज्यांनी मुदतीत शेड्स काढली नसतील त्यांची नावे नोंद करावी व त्याचा आढावा घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी. जेणेकरून पुढील वर्षी या आस्थापनांना परवानगी नाकारता येऊ शकेल, अशा सूचना आयुक्तांनी इमारते व कारखाने विभागाच्या संबंधित सहाय्यक अभियंत्यांना दिले आहेत.