मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेला बेस्ट उपक्रम सध्या आर्थिक तोट्यात आहे. अश्या परिस्थितीत एकाच कामगाराकडून बस वाहकाचे व बस चालकाचे असे दोन प्रकारचे काम करून घेण्याचा नियम करणारा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे सादर करण्यात आला. मात्र हा प्रस्ताव सर्व पक्षीय सदस्यांनी विरोध करत नामंजूर केला आहे.
बेस्ट उपक्रमात सध्या बेस्ट वाहक व बेस्ट चालक अशी दोन पदे आहेत. वाहकांकडून बस चालवण्याचे तर चालकांकडून कंडक्टरचे काम केले जाते. मात्र या पुढे नवीन भरती करावयाची झाल्यास एकाच कर्मचाऱ्याकडून चालकाचे व वाहकाचे काम करून घेण्यासाठी व नव्या पदाची सुरुवात करण्यासाठी बेस्ट समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना बेस्टमध्ये भरती करायची आहे असे या प्रस्तावात म्हटलेले नाही. प्रशासनाने भरती करायची आहे असे स्पष्ट केले तरच असे नियमात बदलता येतील. बेस्टमध्ये भरती करताना तरुणांना संधी दयाळूची अशी मागणी भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.
बेस्ट मध्ये कित्तेक वर्षे भरती करण्यात आलेली नाही. बेस्टमध्ये सध्या किती पदे मंजूर असून किती पदे रिक्त आहेत याची सविस्तर माहिती समितीपुढे सादर करावी. तसेच रिक्त असलेल्या पदाबच्या भरतीसाठी बेस्टने काय योजना आखली आहे याची माहिती द्यावी अश्या मागण्या शिवसेनेच्या सुहास सामंत यांनी केली. काँग्रेसच्या रवी राजा यांनी बेस्टने ३०० ते ४०० बसेस भंगारात काढल्या आहेत. ७३०० कंडक्टर तर ६५०० ड्रायव्हर निवृत्त झाले आहेत. यामुळे या जागा रिक्त आहेत. एकाच व्यक्तीलावाहक आणि चालकाचे काम करायचे असल्यास बेस्टकडून कोणत्याही ठिकाणी पॉईंट टू पॉईंट बस सेवा पुरवलीच जात नाही यांमुळे हा प्रस्ताव योग्य नसल्याने प्रस्ताव रेकॉर्ड करावा अशी मागणी केली.
यावर बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक संजय भागवत यांनी भरती आता करण्याची योजना नाही. फक्त अर्हता बदल केली जाणार आहे. बेस्टच्या ३३०० बसेसच्या तुलनेत १२२९० कंडक्टर आणि ११७४२ ड्रायव्हर आहेत. बसेसच्या संख्येप्रमाणे एका बस वर तीन पाळ्यांमध्ये ३ ड्रायव्हर व ३ कंडक्टर असायला हवेत मात्र सध्या हे प्रमाण साढेतीन इतके आहे. नव्या अर्हतेनुसार भरती झाल्यास तो कर्मचारी एका वेळी वाहक किंवा चालकाचे एकच काम करेल. सध्या कार्यरत असलेले ड्रायव्हर कंडक्टर यांचे प्रमाण ७५ टक्के ठेवून जे पडेल ते काम करणाऱ्या २५ टक्के कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल असे सांगितले. यावर सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.