![](https://i.ytimg.com/vi/2eCJC_8N_ZE/maxresdefault.jpg)
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेने सोसायटींच्या आवारात लावण्यासाठी येत्या १ ते ७ जुलै दरम्यान विनामूल्य रोपटी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या सोसायटींद्वारे ५ किंवा त्यापेक्षा अधिक रोपटी लावली जातील, त्या सोसायटींमध्ये महापालिकेच्या कर्मचा-यांद्वारे शास्त्रीय पद्धतीने वृक्षारोपण करुन देण्याचीही सुविधा मोफत देण्यात येणार आहे. दि. १ ते ७ जुलै २०१७ दरम्यान ज्या सोसायटींना आपल्या सोसायटीच्या परिसरात वृक्षारोपण करावयाचे असेल त्यांनी विनामूल्य रोपटी प्राप्त करुन घेण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उद्यान खात्याची एक विशेष आढावा बैठक आज सकाळी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. या बैठकीत विनामूल्य रोपटी वाटप व फळझाडांची लागवड या बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उद्यान खात्याचे उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकी दरम्यान ज्या सोसायटींना वा नागरिकांना आपल्या सोसायटींच्या परिसरात वृक्षारोपण करावयाचे असेल, त्यांना दरवर्षी पावसाळ्यादरम्यान अत्यल्प दरात झाडांची रोपटी महापालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येतात. मात्र येत्या १ ते ७ जुलै २०१७ दरम्यान महापालिका ही रोपटी पूर्णपणे विनामूल्य देणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रात तुलनेने कमी असलेल्या फळझाडांच्या संख्येमुळे पक्ष्यांना त्यांच्या भरणपोषणाच्या दृष्टीने आवश्यक असलेली फळे पुरेशी मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका उद्याने व सोसायटींच्या परिसरात झाडे लावताना फळझाडांची रोपटी लावण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. झाडे लावताना जांभूळ, पेरु, गावठी-आंबे, टेंभूर्णी, आवळा, चिकू, भोकर, तामण यासारख्या झाडांना प्राध्यान्य दिले जाणार आहे, 'मलबार हिल' टेकडी परिसरातही मोठ्या प्रमाणात फळझाडे लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्याचे परदेशी यांनी सांगितले.