मुंबई, दि. 8 : सहकार व पणन विभागाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी राज्यातील 16 जिल्ह्यांत व्यापारी बँकेच्या सहकार्याने सुलभ पीककर्ज अभियान 2017 प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा, विविध वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
6 जूनपासून राज्यातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, नागपूर व वर्धा या 16 जिल्ह्यांत व्यापारी बँकेच्या मदतीने सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, जिल्हा बँकेचे निरीक्षक व संस्था सचिवांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावे आयोजित करुन सुलभ पीककर्ज अभियान राबविले जात आहे. 31 जुलैपर्यंत हे अभियान सुरु राहणार असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना राज्य सहकारी बँक व सक्षम व्यापारी बँकांमार्फत पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्याबाबतही त्यांनी यावेळी आढावा घेतला. मोडकळीस आलेल्या व अवसायनात निघालेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करण्याऐवजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ किंवा राज्य सरकारने लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन सदर संपादित मालमत्ता भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासंबंधीही लवकरच धोरण ठरविण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
शीतगृहे व विपणनाची मुल्यवर्धित साखळी (Value Added Chain) तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडील उपाययोजनांबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.