मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईमधील सायन रावळी कॅम्प येथील पालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवासस्थान इमारती खाली करून या कर्मचाऱ्यांना माहुलला पाठवण्यात येणार होते. मात्र पालिकेच्या स्थायी समितीत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवासस्थान इमारतींची दुरुस्ती करताना माहुलला न पाठवता त्याच विभागात स्थलांतरीत करावे अशी मागणी शिवसेनेच्या मंगेश सातमकर यांनी केली होती. या मागणीला महापालिका प्रशासनाने तयारी दर्शवली आहे.
पावसाळ्यापूर्वी पालिकेने एफ नॉर्थ विभागातील ए १ व ए २ या दोन इमारतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी प्रशासनाने आणला होता. या दोन्ही इमारतीत 40 कर्मचारी राहतात. त्यांना माहूलला स्थलांतर करण्याएेवजी पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या इमारतींमध्ये स्थलांतर करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी केली. एफ नॉर्थमध्ये मालमत्ता विभागाच्या इमारतीमधील 39 घरे गेल्या तीन - चार वर्षापासून बंद आहेत. माहूलमध्ये शाळा, रुग्णालये, दवाखाने, बस आदी नागरी सुविधा नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत संबंधित बाधितांना वर्षभरासाठी स्थलांतर केल्यास त्यांच्या आयुष्याचे नुकसान होईल असे सातमकर यांनी म्हटले होते. स्थायी समिती सदस्यांच्या सूचना लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी सदर प्रस्ताव संपूर्ण माहितीसह सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
बुधवारी पुन्हा सदर प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आणला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी एफ उत्तर विभागात घरे रिक्त नसल्याने चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावर ३१ रूम रिक्त आहेत. यात ३१ कर्मचाऱ्यांना घरे दिल्यावर इतरांना एफ उत्तर विभागातील इतर ठिकाणी रिक्त असलेल्या घरांमध्ये समावेश करून घेऊ असे सांगितले. यावर मंगेश सातमकर यांनी आता मुलांच्या शाळा आणि कॉलेज सुरु होत आहेत. या कर्मचाऱ्यांना स्थलांतरित केल्यास कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळा आणि कॉलेजच्या ऍडमिशनची जबाबदारी पालिका प्रशासन घेणार का असा प्रश्न उपस्थित करत जो पर्यंत कर्मचाऱ्यांच्या स्थलांतराचा प्रश्न निकाली काढला जात नाही तो पर्यंत प्रस्ताव मंजूर करू नका अशी मागणी केली. तर काँग्रेसचे रवी राजा यांनी रावळी कॅम्प अग्निशमन केंद्राबाजूला पालिकेच्या मालमत्ता विभागाची एक इमारत रिक्त पडून आहे. या इमारतीमधील ४० खोल्यांपैकी १० खोल्याना टाळे असून इतर खोल्यांना तळेच नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणले. पालिका कर्मचारी या ठिकाणी ४० वर्षे राहत असून त्यांना माहुल किंवा चेंबूरला न पाठवता या कर्मचाऱ्यांचे याच विभागात पुनर्वसन करावे अशी मागणी रवी राजा यांनी केली.
अखेर स्थायी समितीत सदस्यांच्या भावना लक्षात घेता विजय सिंघल यांनी एफ उत्तर विभागात मालमत्ता विभागाकडे १५६ घरे असून त्यापैकी ३९ घरे रिक्त आहेत हि माहिती खरी असल्याचे मान्य केले. हि घरे कोणत्या कारणाने रिक्त आहेत याची माहिती घेतली जाईल. हि खाली असलेली घरे पालिकेच्या इतर विभागाना दिली आहेत. हि रिक्त असलेली घरे पुन्हा मालमत्ता विभागाच्या ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन याच विभागात करावे यासाठी एक बैठक लावून निर्णय घेऊ असे सिंघल यांनी स्पष्ट केले. यावर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी याबाबत सविस्तर माहिती कसदार करण्याचे आदेश देत हा प्रस्ताव पुन्हा एकदा राखून ठेवला.