१२ प्रकल्पांना मान्यता; उर्वरित प्रकल्पांची कार्यवाही सुरु -मुंबई, १४ जून २०१७ :- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक ( महारेरा ) प्राधिकरणाच्या नियमांना अधीन राहून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) चा विभागीय घटक असलेल्या मुंबईत गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने मुंबई सुरु असलेल्या २३ गृहप्रकल्पांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यापैकी १२ प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
बांधकाम क्षेत्राचे नियमन करून चालना देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महारेरा प्राधिकरणाकडे निर्माणाधीन असलेल्या गृहप्रकल्पांची नोंदणी करण्याच्या नियमानुसार मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने २३ गृहप्रकल्प महारेराकडे नोंदविले आहेत. याद्वारे म्हाडाने महारेरा नियमांप्रती कटिबद्धता दर्शवित पारदर्शक प्रशासन व नागरिकांप्रती विश्वासाहर्ता अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हाडातर्फे काढण्यात येणाऱ्या सन २०१७ च्या सदनिका सोडतीत समाविष्ट करण्यात येणाऱ्या प्रकल्पातील सदनिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये चारकोप, तुंगवा पवई, सिद्धार्थ नगर - गोरेगाव, महावीर नगर - कांदिवली, कन्नमवार नगर - विक्रोळी, गव्हाणपाडा - मुलुंड अशा मुंबईतील एकूण २३ गृहप्रकल्पांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. म्हाडा हि शासनाची गृहनिर्मितीतील अग्रगण्य संस्था असून गेल्या सहा दशकांच्या प्रवासात म्हाडाने राज्यातील सुमारे सहा लाख कुटुंबियांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून दिली आहेत. म्हाडाची संगणकीय सोडत प्रणाली हि नागरिकांच्या विश्वासाहर्तेचे प्रमाणपत्रच आहे.