मुंबई - दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्गावर ११ स्टॉल्समध्ये (अनुज्ञप्तीपत्र धारक फेरीवाले) मोठ्या प्रमाणात अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले होते. याबाबत परिमंडळ – १ चे उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनानुसार कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली. या अंतर्गत प्रामुख्याने संबंधित लायसन्स धारकांना तपासणी अहवाल देणे, नोटीस देणे, कारणे दाखवा नोटीस देणे आदी बाबी अवलंबिण्यात आल्या होत्या. मात्र संबंधितांद्वारे होणा-या अटी व शर्तींच्या उल्लंघनात कोणताही अपेक्षित बदल न झाल्याने संबंधित नियम व पद्धतींनुसार सदर स्टॉल्सचे लायसन रद्द करण्यात आले. तसेच लायसन रद्द झाल्याने अनधिकृत व बेकायदेशीर ठरलेली सदर ११ फेरीवाल्यांचे स्टॉल्स महापालिकेच्या 'डी' विभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आली आहेत. यामध्ये पंजाबसिंद, रँप्स ऍण्ड रोल्स यासारख्या स्टॉल्सचा समावेश आहे, अशी माहिती'डी' विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर यांनी दिली आहे.
भुलाभाई देसाई मार्गावर ब्रिचकँडी रुग्णालय व जुन्या अमेरिकन दुतावासाजवळील परिसरात वेगवेगळ्या वस्तू विक्रींच्या अनुषंगाने अनुज्ञप्तीप्राप्तधारक फेरीवाले (License Holder Hawker) कार्यरत होते. या फेरीवाल्यांना ज्या अटी व शर्तींच्या आधारे लायसन्स देण्यात आले होते, त्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आले. यामध्ये प्रामुख्याने 1) ज्या प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी लायसन्स देण्यात आले आहे, त्याऐवजी दुस-या प्रकारच्या वस्तूंची विक्री करणे; 2) जेवढ्या जागेसाठी लायसन्स देण्यात आले आहे, त्यापेक्षा अधिक जागा व्यापणे 3) तसेच ज्या व्यक्तीच्या नावावर लायसन्स आहे, त्याच्या ऐवजी दुस-याच व्यक्तीने सदर ठिकाणी व्यवसाय करणे; यासारख्या नियमबाह्य व बेकायदेशीर बाबींचा समावेश होता.
सदर ११ अनुज्ञाप्तीपत्रधारक फेरीवाल्यांनी संबंधित अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने त्यांना यापूर्वीच महापालिकेद्वारे तपासणी अहवाल (Inspection Report) देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती.मात्र सदरबाबत कोणतीही अपेक्षित सुधारणा न झाल्याने संबंधित कायदेशीर प्रक्रियेनुसार सदर ११ स्टॉल्सचे (फेरीवाल्यांचे)लायसन्स रद्द करण्यात आले. यानुसार महापालिकेच्या 'डी' विभागाद्वारे आज करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अनधिकृत व बेकायदेशीर ठरलेल्या सदर ११ फेरीवाल्यांचे स्टॉल्स तोडण्यात आले आहेत. यामध्ये पंजाबसिंद, रॅप्स ऍण्ड रोल्स यासारख्या प्रोव्हीजन स्टोअर्सचे लायसन्स असून खाद्यपदार्थ / दुग्धजन्य पदार्थ विक्री करणा-या स्टॉल्सचा समावेश आहे.