वाहनतळांसाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2017

वाहनतळांसाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा


मुंबई / प्रतिनिधी - दक्षिण मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाकरिता वाहनतळांसाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईतील ८ वाहनतळाकरिता ही सुविधा लागू होणार आहे. याबाबत नुकतीच प्राथमिक चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. येत्या तीन महिन्यात हे अँप कार्यन्वित होईल, अशी माहिती ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. 

आपल्या कामांसाठी, पर्यटनासाठी दक्षिण मुंबईत येणा-या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. या वाहनधारकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी अनेक ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेची वाहनतळ सुविधा आहे. मात्र अनेकदा यापैकी कोणत्या वाहनतळावर जागा उपलब्ध आहे? याची माहिती नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होते, ही गैरसोय लक्षात घेऊन दक्षिण मुंबईतील ८ वाहनतळांच्या ठिकाणी 'ऑनलाईन बुकिंग' सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बुकिंगची प्राथमिक तांत्रिक चाचणी नुकतीच घेण्यात आली. ऑनलाईन बुकिंग व ऍप आधारित बुकिंग सुविधेच्या पहिल्या टप्प्यात ८ वाहनतळांवर ही सुविधा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) जवळील ३ वाहनतळांवर २२२, हुतात्मा चौकातील २ वाहनतळांवर १४७, काळाघोडाजवळ ५०, एरॉस जंक्शनला ४२ आणि रिगल सर्कलला २४ अशा एकूण ४८५ जागांवर वाहने उभी करता येणार आहेत. येत्या ३ महिन्यात सुरु करण्यात येईल. प्राथमिक चाचणीच्या वेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, उपायुक्त (महापालिका आयुक्त कार्यालय) रमेश पवार, प्रमुख अधिकारी(आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर, 'ए'विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वाहनतळांच्या ठिकाणी कॅमेरे लावून त्याद्वारे छायाचित्रणाचे संगणकीय पद्धतीने विश्लेषण केले जाईल. संकेतस्थळावर किंवा ऍपवर ही माहिती उपलब्ध होईल. इंटरनेटमुळे वाहनधारकाला कोणत्या वाहनतळावर जागा उपलब्ध आहे, याची माहिती आगाऊ मिळेल. बुकिंगचा संदेश भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त होईल. विशेष म्हणजे प्रस्तावित ऍपद्वारे वाहनचालकाला वाहनतळापर्यंत जाण्याचा मार्गदेखील जीपीएसच्या सहाय्याने दिसू शकेल. मात्र उशीर झाल्यास बुकिंग' आपोआप रद्द होईल व ती जागा दुस-या वाहनास उपलब्ध करुन दिली जाईल.

Post Bottom Ad