मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक वस्तू वेळेवर मिऴत नाही अशी बोंब दरवर्षीच असते. मात्र मागील शैक्षणिक वर्षापासून महापालिकेने शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय वस्तू देण्यास सुरुवात केली. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय वस्तूंचे वाटप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालिका शाळांतील विद्यार्थी पहिल्या दिवासापासून गणवेषात दिसणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या 1195 शाळा आहेत. या शाळांत शिकणा-या मुलांना पालिका 27 शैक्षणिक साहित्य वितरण करते. त्यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयाची तरतूद केली जाते. मागील वर्षी साहित्य वस्तूसाठी 98 कोटी 18 लाख रुपये तर गणवेशासाठी 31 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला होता. या शाळांत शिकणारी बहुतांशी मुले झोपडपट्ट्यांतील मोलमजुरी करणा-या पालकांची असतात. या मुलांना पालिकेकडून आवश्यक शैक्षणिक साहित्य दिले जाते. मात्र या साहित्यासाठी मुलांना वर्षभऱ प्रतीक्षा करावी लागते. ही प्रथा अनेक वर्षापासून सुरू होती. यावरून पालिकेच्या स्थायी समिती, पालिका सभागृहात अनेकेवेळा वादही झाले. वाद शिगेला पोहचल्यानंतर प्रशासनाने गेल्या शैक्षणिक वर्षापासून या प्रथेत बदल करावा लागला. गेल्यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला होता. यंदाही वेऴेत साहित्य मिऴेल अशी तयारी पालिकेने केली होती. पालिका शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी याबाबत विशेष लक्ष घालून वेळेत वस्तू मिळतील यासाठी पाठपुरावा केला. गुरुवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर, स्थानिक नगरसेवक व सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष रोहिणी कांबळे, उपायुक्त मिलीन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी उपस्थित होते. आर - दक्षिण विभागातील चारकोप गाव महानगर पालिका शाळा, चारकोप सेक्टर - 2 मराठी शाऴा, एच पूर्व विभागातील रामकृष्ण परमहंस महानगरपालिका, शिवडी -वडाऴा महानगरपालिका शाळा या शाळांमध्ये क्रमिक पुस्तके आणि 85 शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना यापुढेही शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी साहित्य मिळेल याची काळजी पालिका प्रशासनाने घ्यावी, असे शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी यावेळी सूचित केले.