बांबूंचा वापर करुन महापालिका उभारणार पहिले हरित अग्निशमन केंद्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2017

बांबूंचा वापर करुन महापालिका उभारणार पहिले हरित अग्निशमन केंद्र


मुंबई / प्रतिनिधी -
उंच इमारतींमध्ये आगीच्या घटनांची संख्या हे जगभरातील मोठ्या शहरांपुढे एक मोठे आव्हान आहे. बृहन्मुंबई महापालिका देखील या अनुषंगाने प्रतिबंधात्मक बाबींवर सातत्याने काम करीत आहे. महापालिकेच्या 'डी' विभागांतर्गत येणा-या लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपीयन-सी रोड) व भुलाभाई देसाई मार्ग (वॉर्डन रोड) परिसरात मोठ्या प्रमाणात उंच इमारती आहेत. याच मार्गाच्या जवळपासच्या परिसरात गेल्या ५ वर्षांमध्ये ४९५ आगीच्या घटना घडल्या आहेत. या बाबी लक्षात घेऊन याच परिसरातील प्रियदर्शनी पार्कमधील आरक्षित जागेवर अग्निशमन केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

नेपियन-सी रोडच्या परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये लागलेल्या आगींमध्ये 'माऊंट ब्लँक' या इमारतीला लागलेल्या आगीचा उल्लेख करावा लागेल. या दुर्दैवी घटनेत आगीत ५ पुरुष व २ महिलांसह ७ व्यक्तींचा मृत्यू झाला होता, तर ३० व्यक्ती जखमी झाल्या होत्या. तसेच भुलाभाई देसाई मार्गावरील 'तिरुपती अपार्टमेंट' येथे लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून १० पुरुष व १६ महिलांचा जीव वाचविला होता. याच परिसरांमध्ये गेल्या ५ वर्षात आगीच्या ४९५ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता या परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणे अत्यंत गरजेचे होते. यानुसार हे अग्निशमन केंद्र उभारण्यात येत असून महापालिकेचे हे पहिलेच 'हरित अग्निशमन केंद्र' (Green Fire Station) असणार आहे. हे केंद्र संपूर्ण बांबूंचा वापर करुन उभारण्याचे; तसेच या अग्निशमन केंद्राभोवती पुरेशा प्रमाणात झाडी / वेली लावण्याबाबत प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिले आहेत, अशी माहिती महापालिकेचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली.

'स्टँडिंग फायर ऍडव्हायजरी कॉन्सिल' यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक १०.३६ चौरस किलोमीटर मागे एक अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात मुंबई अग्निशमन दलाचे ३४ अग्निशमन केंद्र व १७ छोटे अग्निशमन केंद्र यानुसार एकूण ५१ अग्निशमन केंद्र आहेत. तथापि, ही बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राची गरज लक्षात घेऊन ही संख्या वाढण्यासाठी महापालिका कार्यवाही करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून नेपियन-सी मार्गावर असणा-या प्रियदर्शनी पार्कच्या ६५ हजार चौरस मीटर परिसरातील सुमारे ५ हजार चौरस मीटर जागेवर १९९१ च्या विकास आराखड्यामध्ये अग्निशमन केंद्राचे आरक्षण टाकण्यात आले आहे. हेच आरक्षण २०३४ च्या प्रारुप विकास नियोजन आराखड्यात देखील कायम ठेवण्यात आले आहे. सदरची एकूण ६५ हजार चौरस मीटरची जागा ही 'मलबार हिल सिटीझन फोरम' (प्रियदर्शनी पार्क) यांना दत्तक आधारावर परिरक्षणासाठी देण्यात आली होती.

या आरक्षणानुसार सदर जागेवर अग्निशमन केंद्र उभारण्याविषयीच्या कार्यवाहीला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. सदर बाबत ५ जून २०१७ रोजी मा. न्यायालयाने ही याचिका खारिज केली होती. सदर याचिका पुन्हा सुनावणीस घेण्यासाठी संबंधितांद्वारे 'नोटीस ऑफ मोशन' सादर करण्यात आले होते. याबाबत आज दि. १९ जून २०१७ रोजी उच्च न्यायालयाने आपल्या सुनावणी दरम्यान सदर भागात अग्निशमन केंद्राची गरज असल्याचे मत नमूद केले. तसेच याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत विनंती केल्यानुसार सदर अग्निशमन केंद्र हटविण्याबाबत कुठल्याही सूचना उच्च न्यायालयाने दिल्या नाहीत. याबाबत पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येणार आहे.

Post Bottom Ad