मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत पावसाळ्यात साचणा-या पाण्याचा त्वरित निचरा व्हावा यासाठी महापालिकेने शहरात 6 ठीकाणी पंपिंग स्टेशन बांधली. मात्र वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलॅन्ड पंपिंग स्टेशनच्या बांधकामास विलंब केल्याबद्दल मुंबई महापालिकेने संबंधित कंत्राटदारास 9 कोटी 34 लाखांचा दंड ठोठावला आहे. तसा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.
मुंबईत पावसाळ्यात सखल भागात दरवर्षी पाणी तुंबते. या पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईत 6 ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात हाजीअली, इर्ला, ब्रिटानिया, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, गझधरबंध, पंपिंग स्टेशनचा समावेश आहे. यापैकी गझरबंध पंपिंग स्टेशनचे काम प्रगती पथावर आहे. तर मोगरा व माहुल पपिंगचे काम प्रस्तावित आहेत. तर इतर पंपिंग कार्यान्वित झाले आहे. मात्र, वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड पंपिंगचे काम युनिटी एम अँड पी - डब्ल्यू पीके कन्सोट्रीसम या कंत्राटदाराला देण्यात आले होते. हे काम पावसाळा वगळून 15 महिने या कालावधीत पूर्ण करायचे होते. या संदर्भातील प्रस्ताव 29 सप्टेंबर 2011 च्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आले होते. या दोन्ही पंपिंग स्टेशनचे काम वेळेत पूर्ण न केल्यास 5 टक्के दंड आकारण्यात येईल. असे कंत्राट देतानाच पालिकेने नमूद केले होते. मात्र, ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्याबद्दल या कंत्राटदाराला लव्हग्रोव्हसाठी 5 कोटी 45 लाख 79 हजार रुपये तर क्लिव्हलँड प्रकल्पासाठी 3 कोटी 89 लाख 9 हजार रुपये असा एकूण 9 कोटी 34 लाख 89 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर माहितीसाठी ठेवला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर दोन्ही पंपिंग स्टेशनच्या कंत्राटदारांकडून हा दंड वसूल केला जाणार आहे.