मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणा-या तानसा जलवाहिनीच्या (Pipeline) अवतीभोवती असणारी अतिक्रमणे हटविण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. यानुसार मोकळ्या झालेल्या जागांचा नागरिकांना आरोग्यपूर्ण फायदा व्हावा, यादृष्टीने तसेच अतिक्रमणांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुमारे ३९ किमी लांबीच्या जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला 'जॉगिंग ट्रॅक' व 'सायकल ट्रॅक' उभारण्याबाबत प्रशासकीय प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) यांना दिले आहेत. त्याचबरोबर सदर प्रस्तावानुरुप जॉगिंग व सायकल ट्रॅक उभारण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने काय करता येऊ शकते? याची पडताळणी व अभ्यास करण्याचेही निर्देश जलअभियंता खात्याला देण्यात आल्याची माहिती उपायुक्त (वि.अ.) रमेश बांबळे यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात असणारी तानसा जलवाहिनीची सुमारे ३९ किलोमीटर लांबी लक्षात घेतल्यास प्रस्तावित'जॉगिंग ट्रॅक' व 'सायकल ट्रॅक' हा उपलब्ध माहितीनुसार या प्रकारचा देशातील सर्वात मोठा ट्रॅक ठरु शकेल, अशीही माहिती उपायुक्त बांबळे यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे ३९ किलोमीटर लांबीची तानसा जलवाहिनी आहे. या जलवाहिनीचा एक भाग हा मुलुंड ते धारावी असून दुसरा भाग हा घाटकोपर ते शीव असा प्रामुख्याने आहे. ही जलवाहिनी महापालिकेच्या टी, एस, एम पश्चिम, एन, एल, एफ उत्तर, के पूर्व, एच पूर्व, एच पश्चिम व जी उत्तर या १० प्रशासकीय विभागातून जाते. यामध्ये मुलुंड, भांडुप, सहार, वाकोला, हुसेन टेकडी, खार पूर्व, माहिम, धारावी, घाटकोपर, कुर्ला पूर्व, आणिक डेपो आदी परिसरांचा समावेश होतो.
यापैकी जलवाहिनीच्या दुतर्फा असणा-या १० – १० मीटरच्या संरक्षित परिसरात उद्भवलेली अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. यानुसार ९ प्रशासकीय विभागांपैकी टी, एस, एन, एम पश्चिम व जी उत्तर या ५ प्रशासकीय विभागांच्या हद्दीतील तानसा जलवाहिनीच्या सभोवतालची अतिक्रमणे हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित एल, एफ उत्तर, के पूर्व, एच पूर्व या ४ प्रशासकीय विभागांमध्ये काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती रमेश बांबळे यांनी दिली आहे.
महापालिका क्षेत्रातील ३९ किलोमीटर लांबीच्या तानसा जलवाहिनीच्या दुतर्फा असणारी १० – १० मीटरची जागा मोकळी झाल्यानंतर संभाव्य अतिक्रमणांना प्रतिबंध व्हावा यादृष्टीने जलवाहिनीच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र याचबरोबर या जागेचा चांगला उपयोग होऊन परिसरातील नागरिकांनाही त्याचा फायदा व्हावा, यादृष्टीने आता या जागेत सायकल व जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, याबाबतचा प्रस्ताव तयार करताना जलवाहिनीच्या परिरक्षणासाठी आवश्यक असणारी जागा मोकळी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विमानतळ प्राधीकरण, भांडुप संकुल,खाजगी जागा यासारख्या जागा प्रस्तावित जॉगिंग / सायकल ट्रॅक बांधकामातून वगळण्यात येणार आहेत, अशी माहिती बांबळे यांनी दिली आहे.
सायकल व जॉगिंग ट्रॅक याचा वापर करणे नागरिकांना सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक तेथे संरक्षक भिंतीला प्रवेशद्वारे ठेवण्याचीही बाब प्रस्तावात नमूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रस्तावाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने प्रस्तावनुरुप कृती आराखडा तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.त्यानुसार याबाबत प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे कार्य प्रगतीपथावर असल्याचीही माहिती उप आयुक्त बांबळे यांनी दिली आहे.