मुंबई, दि. ८ : राज्यात १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड होणार असून या कार्यक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणाचा संस्कार शाळांमधून घराघरात जावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
काल सह्याद्री अतिथीगृहात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक, सर्व उपसंचालक, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक भगवान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवडीत शिक्षण विभागाची भूमिका सर्वात महत्वाची असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, वृक्ष लावणे हा केवळ शासकीय कार्यक्रम राहू नये. मिशन म्हणून सर्वांनी हे काम हाती घ्यावे. राज्यात ४ कोटी वृक्ष लावतांना प्रत्येकाच्या मनात वृक्ष लावण्याच्या इच्छेचे बीजारोपण झाले पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न व्हावेत.
शाळा ही सर्वांच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जीवन जगण्याचे धडे याच शाळांमधून दिले जातात. त्यामुळे वृक्ष लागवडीचा संदेश, वृक्षांचे महत्व शाळांमधून विद्यार्थ्यांना समजवून दिल्यास पर्यावरण रक्षणाच्या महत्वाच्या कामात ही उमलती पिढी फार लहानपणापासूनच सहभागी होईल. मागच्या पिढीने आपल्या हाती एक सुंदर धरा दिली आहे. आता वसुंधरेचे शोषण थांबवून पुढच्या पिढीच्या हाती एक चांगली पृथ्वी देण्याची जबाबदारी तुमची-माझी सर्वांचीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वन विभागाने ग्रीन आर्मी, हॅलो फॉरेस्ट सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केले असल्याचे सांगतांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूसाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे असे सांगून श्री. मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीची जागृती वाढण्यासाठी शाळांनी प्रभात फेऱ्या, वृक्ष दिंड्या, विविध स्पर्धांचे आयोजन करून नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत, अधिकाधिक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन ही केले.