मुंबई - महापालिका प्रशासनाने नालेसफाई दावा केला आहे तर सत्ताधारी शिवसेनेने नालेसफाई चांगली झाल्याचे प्रमाणपत्र प्रशासनाला दिले असताना पालिकेचे दावे फोल ठरवित, मान्सूनपूर्व पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यातच मुंबईत अनेक साथीच्या आजारांची संख्या वाढत आहे यामुळे नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची खबरदारी घ्या, अशी सक्त ताकीद ‘मातोश्री’ बंगल्यावर शनिवारी सकाळी पार पडलेल्या नगरसेवकांच्या बैठकीतशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील नागरसेवकांना दिली.
युती तोडून स्वबळावर महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतरही भाजपाचे सत्तेचे गणित फसले. मात्र, सत्ताधारी शिवसेनेला कचाट्यात पकडण्याची एकही संधी भाजपाने सोडलेली नाही. पारदर्शकतेच्या पहारेकऱ्याच्या भूमिकेत काम करणाऱ्या भाजपाने नालेसफाईवरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबल्यास भाजपाला शिवसेनेवर टिका करायला आणखी संधी मिळणार असल्याने, शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. याचे पडसाद ‘मातोश्री’वर बोलाविलेल्या शनिवारच्या नगरसेवकांच्या बैठकीत उमटले. उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना आपापल्या प्रभागात सतर्क राहण्याचे आदेश या बैठकीतून दिले, विभागातील नालेसफाई, घरगल्ल्या, गटारे साफ होतात कि नाही याकडे लक्ष द्या व वॉर्डाकडून त्वरित सफाई करून घ्या, पावसाळयात रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडतात अश्या वेळी खड्डे पडल्याचे दिसल्यास वॉर्डकडून त्वरित खड्डे बुजवून घ्या, विभागातील नागरिकांशी भेटीगाठी घेऊन त्याच्या तक्रारी काय आहेत त्या समजून त्यावर त्वरित कारवाई करा, नागरिकांना तक्रारीला वाव देऊ नका असे आदेश उद्धव ठाकरे यांनी सर्व नागरसेवकां दिले आहेत.
तसेच मुंबईचा विकास आराखडा गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. २०१४ ते २०३४ या २० वर्षांच्या आराखड्याच्या मसुद्यावर अनेक वेळा चर्चा झाली. मात्र, पहिला आराखडा स्थगिती होऊन सुधारित आराखडा सादर होऊनही अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी नगरसेवकांनी दोनदा मुदत वाढवून घेतली, परंतु अभ्यास केलाच नाही. याचीही ठाकरे यांनी दखल घेत, विकास आराखड्याचा अभ्यास करा, चर्चा करा आणि सभागृह नेत्यांमार्फत सूचना मांडा, असे आदेश दिले.
ठरावाच्या सूचना सभागृह नेत्यांना दाखवा - राज्यातील सर्व टोल नाक्यांवर नगरसेवकांच्या वाहनांना विनामूल्य प्रवेश देण्याची ठरावाची सूचना शिवसेनेचे नगररसेवक तुकाराम पाटील यांनी केली होती. मात्र, याचे सर्वत्र पडसाद उमटून शिवसेनेवर टिका झाली. या प्रकरणी ठाकरे यांनी शनिवारी नगरसेवकांची चांगलीच कानउघडणी केली. ठरावाच्या सूचना थेट पालिकेच्या चिटणीस खात्याकडे देण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करा, सभागृह नेते यशवंत जाधव यांना दाखवा, असे पक्षप्रमुखांनी नगरसेवकांना बजावले आहे.