मुंबई, दि. 1 June 2017 - प्रवाशांना नियोजित ठिकाणी पोहचविण्याचे काम एसटी महामंडळाने केले असून विकासाच्या सर्व क्षेत्रात एसटी महामंडळाचे योगदान आहे. बस प्रत्येक व्यक्तीला आपली वाटते. एसटी गावात चालवायची असेल तर कर्मचारी चालक व प्रवासी यांना आपुलकी असलीच पाहिजे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केले. मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 69 वा वर्धापन दिन साजरा झाला. त्यावेळी रावते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया, नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी, वाहतूक महाव्यवस्थापक कॅप्टन रा.रा.पाटील, एसटी कामगार संघटनेचे प्रतिनिधी,तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रवाशांसाठी सुख सुविधा असलेल्या व जय महाराष्ट्र हे बोधचिन्ह असलेल्या शिवशाही बसचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते करण्यात आले तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी, कामगार यांच्या हिताच्या अनेक योजना यावेळी जाहिर करण्यात आल्या.
रावते म्हणाले की, एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून जय महाराष्ट्र हा जनतेचा आवाज पोहचविण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन या बोधचिन्हात बदल न करता जय महाराष्ट्र या बोधचिन्हाचा वापर केला आहे. येत्या 10 तारखेपासून टप्प्या-टप्प्याने शिवशाही बस सुरू करण्यात येणार असून येत्या डिसेंबर पर्यंत एक हजार शिवशाही बस उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी परिवहन राज्य महामंडळाचे कामगार, संघटनेचे प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.