मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पालिका मुख्यालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी शुभारंभ सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दिनांक १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०० वाजता महापालिका मुख्यालय, प्रवेशद्वार क्रमांक २, येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुंबईच्या उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार राज पुरोहित, आमदार भाई जगताप, सभागृह नेता यशवंत जाधव, विरोधी पक्षनेता रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, महापालिकेतील सर्व विविध पक्षीय गटनेते, विविध वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष यांच्यासह ए, बी व ई प्रभाग समितीच्या अध्यक्षा गीता गवळी, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, सर्व नगरसेवक / सर्व नगरसेविका, सर्व नामनिर्देशित नगरसेवक /नगरसेविका यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन यांनी केले आहे.
शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईकर तसेच पर्यटकांसाठी विशेष आकर्षण -
पालिका मुख्यालयात केलेली विद्युत रोषणाई मंगळवार, दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून दिनांक १५ ऑगस्ट, २०१७ पर्यंत सायंकाळी ७.४५ ते मध्यरात्रौ २.०० वाजेपर्यंत मुंबईकरांना पाहता येणार आहे. प्रारंभी, सायंकाळी ७.४५ ते ७.५० वाजता ‘लाईट कॅसकेडींग’ ही आकर्षक विद्युत रोषणाई पाहता येईल. दररोज वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोषणाई हे मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण असणार आहे. तसेच राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त विषयानुरुप वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मुंबईतील नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच पर्यटकांना पालिका मुख्यालयाची इमारत व पालिका सभागृह या ऐतिहासिक वास्तु, स्थायी समिती व सभागृह या बैठकांव्यतिरिक्त या दरम्यान सकाळी ११.०० ते दुपारी २.०० दरम्यान पाहता येणार असल्याचेही पालिकेने कळविले आहे.