कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पणावर भाजपाचा बहिष्कार -
मुंबई / प्रतिनिधी - कालीदास नाट्य मंदिर नाट्यगृहामुळे मुंबईच्या वैभवात आणखी भर पडली आहे. या वास्तूमुळे घोटाळ्यांचे आरोप करणार्यांना चोख उत्तर मिळाले आहे. आता कुठे गेले ते घोटाळ्याचे आरोप करणारे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईत कुठे काही झाले तरी थेट पालिका टीकेचा धनी ठरते. मात्र केवळ गदारोळ करणे सोपे असते, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. मुंबई महापालिकेने मुंलुडमध्ये उभारण्यात आलेल्या महाकवी कालीदास नाट्य मंदिराचे लोकार्पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ठाकरे बोलत होते. अंधेरी व मुलुंड येथील क्रीडा संकुलाच्या कामात सत्ताधारी शिवसेना भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप भाजपाने केला होता. यामुळे या कार्यक्रमावर भाजपाने बहिष्कार टाकला होता. गेले दिड वर्षे कालिदास नाट्य मंदिराचे लोकार्पण करावे म्हणून भाजपाचे माजी सुधार समिती अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश गंगाधरे पाठपुरावा करत होते. याच दरम्यान भाजपाने अंधेरी आणि मुलुंड येथील ललित कला मंडळाच्या कारभारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. हे कला मंडळ शिवसेनेच्या ताब्यात आहे. या मंडळाच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज या नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्राला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जपण्याचे काम थिएटर, रंगमंचाच्या माध्यमातून केले तरच हा वारसा पुढच्या पिढीला समजेल. कालीदास नाट्यगृहात केलेल्या अत्याधुनिक सुविधांचे कौतुक करताना मुंबईत अशा थिएटरची संख्या वाढली पाहिजे तरच संस्कृती टीकेल. रस्ते, पाणी, शाळा, रुग्णालये या गरजांप्रमाणेच मुंबईतही थिएटरसारख्या सांस्कृतिक सुविधा करणे आवश्यक असल्याचे ठाकरे म्हणाले.
पूर्व उपनगरासह मुंबई आणि राज्यभरातील अनेक कलाकारांना जागा उपलब्ध होत नसल्यामुळे दोन-दोन वर्षे आपल्या कलेचे प्रदर्शन मांडण्यासाठी वाट पहावी लागते. त्यामुळे कालीदास नाट्यमंदिराजवळ आर्ट गॅलरी सुरू करावी, जेणेकरून कलाकारांना आपली कला दाखवण्याची संधी मिळेल अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. गिरणी कामगारांनी मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रस्तावित टेक्सटाईल म्युझियमध्ये गिरणी कामगारांचा लढा मांडा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या. मुंबईसाठी गिरणी कामगारांनी रक्त सांडले आहे. हा लढा आजच्या पिढीला समजण्यासाठी म्युझियमध्ये गिरणी कामगारांना मनाचे स्थान दिले पाहिजे असेही ते म्हणाले. महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत पावसाळापूर्व कामे योग्य प्रकारे करण्यात आली आहेत. नालेसफाई, पंपिंग स्टेशन उभारण्यात आल्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार कमी झाले आहेत. त्यामुळे यावर्षी मुंबईत कुठेही पाणी न तुंबता मुंबईकरांचा पावसाळा सुखकारक जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील अनेक भाग हे समुद्र सपाटीपेक्षा खाली आहेत. त्यामुळे पाणी काही वेळा तुंबण्याचे प्रकार घडत असताना पालिकेला नाहक टीकेचे लक्ष्य केले जाते असे ठाकरे म्हणाले.
यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, पालिका आयुक्त अजोय मेहता, आमदार सुनील राऊत, अशोक पाटील, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, बाजार समिती अध्यक्षा सान्वी तांडेल, आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा सिंधू मसूरकर, कलाकार आणि विश्वस्त अशोक हांडे, सुबोध भावे, साहित्यिक गंगाराम गवाणकर, लता नार्वेकर, माजी महापौर दत्ता दळवी, स्नेहल आंबेकर, सहआयुक्त विजय सिंघल, उपायुक्त किशोर क्षिरसागर आदी उपस्थित होते.
करदात्यांच्या पैश्यामधून मुलुंडकरांना चांगल्याप्रकारे खेळाची सुविधा हवी -
ललित क्रीडा व कला प्रतिष्ठान खोडा घालत असेल तर अशा गैरकारभार करणाऱ्या प्रतिष्ठनच्या कार्यक्रमाला जाणे आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे कालिदासाच्या कार्यक्रमावर आमच्या पक्षाने बहिष्कार घातला आहे. मुलुंडमधील स्विमिंग पूल अद्यापही बंद आहे. स्विमिंग पुलाची सुविधा मुलुंड आणि मुंबईकरांना देऊ शकत नाहीत. मग हा उदघाटनाचा देखावा कशासाठी? नाट्यगृहाचे काम योग्य प्रकारे झालेले नाही. तसेच ललित क्रीडा व कला प्रतिष्ठानमधील कामगाराची होणारी गळचेपी तसेच येथील गैरव्यवहार प्रकरणी आम्ही केलेल्या मागणीनुसार चौकशी सुरू आहे. त्यामुळे असे असताना आम्ही त्यात सहभागी कसे व्हायचे. लोकहिताच्या कार्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु बृहन्मुंबई ललित क्रीडा व कला प्रतिष्ठांच्या गैरकारभारात आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही, त्यामुळेच आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घालून आमचा निषेध नोंदवला आहे
मनोज कोटक, गटनेते - भाजपा
