आरजे मलिष्का व रेड एफएमवर कायदेशीर कारवाईची पालिका आयुक्तांकडे मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरजे मलिष्का व रेड एफएमवर कायदेशीर कारवाईची पालिका आयुक्तांकडे मागणी

Share This

मुंबई / प्रतिनिधी - रेडएफ वरील आरजे मलिष्काने ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय ?’ हे गाणे बोलले आहे. या गाण्याला मुंबईकर नागरिकांकडून व सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळत आहे. मलिष्काने गायलेले हे गाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसनेच्या जिव्हारी लागले आहे. मलिष्काच्या या गाण्यामुळे महापालिकेची बदनामी झाल्याने रेड एफएमवर व मलिष्कावर कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांच्यावर ५०० कोटींचा दावा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर व अमेय घोले यांनी आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात समाधान सरवणकर यांनी पालिका आयुक्ताना पत्रही दिले आहे.

आरजे मलिष्का हिने गायलेले ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय ?’ हे गाणे गेल्या काही दिवसात वायरल झाले आहे. रेड एफएमवरही हे गाणे सतत ऐकवले जात आहे. या गाण्यात मुंबईतले ट्रॅफिक, उशिरा धावणाऱ्या लोकल गाड्या इत्यादी कारणासाठी महापालिकेला जबाबदार धरले आहे. त्यामुळे मलिष्काचे अज्ञान उघड झाले आहे. मलिष्काने आपल्या कामावर लक्ष द्यावे. दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नये, तिला ज्याची माहिती नाही त्याची माहिती करून घ्यावी असे सांगत मलिष्काचे डोके ठिकाणावर नसल्याचा टोला सभागृह नेते यशवंत जाधव यांनी लगावला आहे. मलिष्काच्या गाण्यासारखेच गाणे बनवून नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी या गाण्याची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान मुंबईकरांसाठी पालिकेचे कर्मचारी कोणत्याही सणाची सुट्टी न घेता २४ तास काम करतात. रोज लाखो टन कचरा उचलला जाता, रोज पाणी पुरवठा केला जातो. अशा अनेक सुविधा देणार्‍या कर्मचार्‍यांचा या गाण्यातून अपमान करणे ही निंदनीय बाब आहे असे पत्रात म्हटले आहे. या गाण्यामुळे पालिका कर्मचार्‍यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा डाव असल्याने पालिकेचे व कर्मचाऱ्यांचे प्रमुख म्हणून पालिका आयुक्तांनी रेड एफ एम वाहिनीविरोधात कायदेशीर कारवाई तसेच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा अशी मागणी सरवणकर यांनी पत्रात केली आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिल्याचे समाधान सरवणकर व अमेय घोले यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages