मुंबई - कार्पोरेट क्षेत्रात 20 वर्षे कार्यरत असलेले व “टर्नअराऊंड मॅन” म्हणून ओळख असलेले प्रसिध्द अर्थतज्ञ विश्वास पाठक यांच्या “विश्वासमत” या पुस्तकांच्या दोन खंडाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजता मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता पक्षाचे प्रभारी डॉ. विजय चौथाईवाले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. विश्वास पाठक हे एमएसईबी होल्डींग कंपनीचे स्वतंत्र संचालक असून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आहेत. पाठक यांनी गेल्या पाच वर्षात विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक, विधी अशा विविध विषयावर राज्यातील अनेक वृत्तपत्रातून व स्वत:च्या ब्लॉगवरुन विपुल प्रमाणात लेखन केले आहे. या संपूर्ण लेखांचे संकलन म्हणजेच विश्वासमतचे दोन खंड होत. याशिवाय पाठक हे विविध इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिन्यांमधील विविध विषयांच्या चर्चा मध्ये नेहमी सहभागी होत असतात.
गेल्या तीन वर्षांपासून एमएसईबी होल्डींग कंपनीचे संचालक म्हणून व दोन वर्षांपासून प्रदेश भाजपाचे प्रवक्ते म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. मनाला भिडणारे असे लिखाण विश्वासमतच्या दोन्ही खंडांमध्ये वाचकांना वाचायला मिळणार आहे. या दोन्ही खंडांचे प्रकाशक पुण्याच्या अमेय इन्पायरिंग बुक्सचे उल्हास लाटकर आहेत. चाहत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन पाठक कुटुंबियांनी केले आहे.