मुंबई / प्रतिनिधी - बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून ९७ टक्के बेस्ट कर्मचा-यांनी संपाच्या बाजूने मत दिले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप करण्यापूर्वी इशारा म्हणून १ ऑगस्ट पासून बेस्ट कर्मचारी वडाळा येथील डेपो समोर उपोषण करणार आहेत. या उपोषणाकडे बेस्ट आणि पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संप करण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनी दिला आहे.
बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. यामुळे बेस्टचे आर्थिक व्यवहार करणे कठीण झाले आहे. यामुळे बेस्टला आर्थिक मदत करावी म्हणून पालिकेकडे सातत्याने मागणी केली जात आहे. पालिकेने बेस्टला एक हजार कोटी रुपये देण्याची मागणी केली असता पालिका आयुक्तांनी कृती आराखडा बनवण्याचे आदेश दिले होते. हा कृती आराखडा कर्मचाऱ्यांसाठी घातक असल्याने कृती आराखडा रद्द करण्यात आलं आहे. याच दरम्यान बेस्ट मधील कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नसल्याने न्यायालयाने महिन्याच्या २० तारखेपर्यंत पगार देण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या १२ संघटना एकत्र येत संप करावा कि करू नये याबाबत कर्मचाऱ्यांचे १८ जुलैला मतदान घेण्यात आले.
बेस्टच्या ३६ हजार कामगारांपैकी १९ हजार ९४ कामगारांनी मंगळवारी मतदान केले. यावेळी २० टक्के कामगारांच्या साप्ताहिक सुट्ट्या होत्या, तर काही कामगार टर्मिनसमधूनच काम संपवून घरी गेले. त्यामुळे सर्वच्या सर्व कामगारांनी मतदान केले नाही. १८५३७ कर्मचा-यांचे मत 'संप करावा'च्या बाजूने तर केवळ ४९६ कर्मचा-यांचे मत 'संप करू नये' या बाजूने झाले आहे. यामुळे बहुसंख्य कामगारांनी संप करावा म्हणून मतदान केले असल्याने बेस्ट संयुक्त कृती समिती संपा संदर्भात दोन दिवसांत पुढील दिशा ठरवणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आज शुक्रवारी १ ऑगस्टपासून वडाळा आगारा समोर साखळी उपोषण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी संघटनाचे नेते रोज उपोषणाला बसणार असून कर्मचारी साखळी उपोषणात भाग घेणार आहे असे शशांक राव यांनी सांगितले.
दरम्यान १ ऑगस्ट पासून संप होणार असल्याने मुंबईच्या महापौरांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पालिका आयुक्तांवर बेस्टला तातडीने मदत करावी म्हणून दबाव आणला जाणार आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. तर याबाबत बोलताना संप झाल्यावर मुख्यमंत्र्यांना मध्यस्ती करण्यास विनंती केली जाणार आहे. पालिका आयुक्त हे मुख्यमंत्र्यांनीच बसवले असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बेस्टला आर्थिक मदत दिल्याचे जाहीर करण्यात येणार असून याचे सर्व क्रेडिट भाजपा घेणार आहे म्हणून हा संप घडवून आणला जात असल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी केला आहे.