मुंबई / प्रतिनिधी - बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून ९७ टक्के बेस्ट कर्मचा-यांनी संपाच्या बाजूने मत दिले आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात बेस्टवर संपाचे सावट आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करावा की नाही याबाबत कामगारांचा कौल जाणून घेण्यासाठी सर्व बेस्ट डेपोमध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीने मंगळवारी १८ जुलैला मतदान घेतले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी संप करावा कि, नाही याबाबतचा निर्णय १२ संघटनांनी कामगारांकडे मागितला होता. बेस्टच्या ३६ हजार कामगारांपैकी १९ हजार ९४ कामगारांनी मंगळवारी मतदान केले. यावेळी २० टक्के कामगारांच्या साप्ताहिक सुट्ट्या होत्या, तर काही कामगार टर्मिनसमधूनच काम संपवून घरी गेले. त्यामुळे सर्वच्या सर्व कामगारांनी मतदान केले नाही. १८५३७ कर्मचा-यांचे मत 'संप करावा'च्या बाजूने तर केवळ ४९६ कर्मचा-यांचे मत 'संप करू नये' या बाजूने झाले आहे. यामुळे बहुसंख्य कामगारांनी संप करावा म्हणून मतदान केले असल्याने बेस्ट संयुक्त कृती समिती संपा संदर्भात दोन दिवसांत पुढील दिशा ठरवणार आहे.