असंघटित कामगार कल्याणकारी मंडळामध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2017

असंघटित कामगार कल्याणकारी मंडळामध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार

मुंबई, दि. १९ - केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दिनांक ३१ डिसेंबर २००८ रोजी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम२००८ पारित केलेला असून दिनांक १६ मे २००९ रोजी पासून देशात या अधिनियमाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे या अधिनियमाच्या कलम १४ अन्वये महाराष्ट्र शासनाने दिनांक ३० मे २०१३ रोजी महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम २०१३ पारित केले असून दिनांक ३० मे २०१३ रोजी पासून या नियमांची अंमलबजावणी राज्यात सुरु झालेली आहे. त्यामुळे असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम २००८च्या कलम ६ अन्वये राज्यात लवकरच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापना केली जाणार असून या मंडळामध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार आहे, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात आयोजित बैठक आज कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर याच्या अध्यक्षतेखाली व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीस विकास आयुक्त (असंघटीत कामगार) पंकज कुमार, सहायक कामगार आयुक्त सुनीता म्हैसकर आदी उपस्थित होते.

असंघटित कामगारासाठी नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील ३.६५ कोटी असंघटित कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये विडी कामगार ऊसतोड कामगार, बांधकाम मजूर,दगड खाणीतील कामगार, विणकर, यंत्रमाग कामगार, शेतकरी, मच्छीमार, शेतमजूर, कचरा गोळा करणारे कामगार, घर कामगार, रिक्षा ओढणारे कामगार, वर्तमानपत्र वाटप करणारे कामगार तसेच अगरबत्ती बनवणे, कृषी, कृषी अवजारे हाताळणे इत्यादी १२२ उद्योग व व्यवसायातील असंघटित कामगारांचा समावेश असणार आहे.

Post Bottom Ad