मुंबईत डेंग्यूच्या रुग्णात २६५ टक्यांनी वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2017

मुंबईत डेंग्यूच्या रुग्णात २६५ टक्यांनी वाढ

मुंबईत क्षयरोगाने दररोज १८ लोकांचा मृत्यू
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत डेग्यूंचे गेल्या पाच वर्षात २६५ टक्के रुग्ण वाढले आहेत. तसेच क्षय रुग्णांची संख्याही वाढली असून दिवसाला क्षय रोगाने दररोज १८ लोकांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी प्रजा फाऊंडेशन द्वारे प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेतून उघड झाली आहे. बुधवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्वेतपत्रिका जाहीर करताना सरकारी व रुग्णालयांमध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत तफावत असल्याचे म्हटले आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. पालिकेला यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. पावसाळ्यानंतर डेंग्यूचा आजार बळावतो. प्रजाने नागरिकांच्या दृष्टीकोनातून वीस हजार हून अधिक घरात जावून सर्वेक्षण केले, यात वेगवेगळे सरकारी रुग्णालय व दवाखान्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्येत तफावत आढळून आली. मुंबईत मागील पाच वर्षात २६५ टक्के डेंग्यू रुग्णांची वाढ झाली आहे. पालिका व सरकारी रुग्णालयात मात्र सुमारे १७ हजार ७७१ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. ही आकाडेवारी खोटी असून प्रजाने केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे १ कोटी ९ हजार ४४३ रुग्ण आढळून आल्याचा दावाकेला आहे. मलेरियाच्या रुग्णसंख्येत ही ११ हजार ६०७ आणि ९० हजार ७०३ इतका मोठा फरक आहे. आरोग्य विभागावर मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र रोगांमधील सातत्याने दिसून येणाऱ्या रुग्ण वाढीकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे प्रजाचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी स्पष्ट केले.

तर वेगवेगळ्या रोंगाचे तपशील प्रशासनाकडे नसतील तर त्या रोगांच्या निर्मूलनासाठी योग्य उपाययोजना कशी अंमलात आणणार, असा प्रश्न हंसा रिसर्चचे कार्यकारी संचालक श्रीनिवास रमण यांनी उपस्थित केला. तसेच रुग्ण संख्येत तफावत दाखविणाऱ्या पालिकेला योग्य हेल्थ मेन्टेनन्स इन्फोर्मेशन सिस्टीम अद्यावत ठेवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील, असे स्पष्ट केले. शिवाली बागायदार यांनी म्हटले की, पालिकेने नकारात्मक दृष्टीकोनातून बाहेर पडून आरोग्यप्रश्नांवर उपाययोजना करुन निरोगी शहरास हातभार लावावा.

महानगरपालिकेत निवडून पाठवलेल्या नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात क्षयरोगाबाबत केवळ ४५ प्रश्न विचारले. मात्र त्यापेक्षा रुग्णालये, दवाखाने, हेल्थ सेंटरच्या नामकरणाचे ६८ प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या आरोग्याचे काही पडले आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

मुंबईत क्षयरोगाने दररोज १८ लोकांचा मृत्यू - 
क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये ही २०१२- १३ मध्ये ३६ हजार ४१७ पासून २०१६- २०१७ मध्ये ५० हजार ०१ इतकी वाढ झाल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. २०१६- १७ मध्ये दररोज जवळपास १८ लोकांचा मृत्यू होतो. तरीही डिरेक्टली ऑब्झव्हर्ड ट्रिटमेंट शोर्ट कोर्स, क्षयनिर्मूलनासाठी सरकारच्या महत्वाच्या उपक्रमामध्ये २०१२ मध्ये ३० हजार ८२८ पासून २०१६ मध्ये १५ हजार ७६७ एवढी लक्षणीय घट झाली. तर डॉट्स सेंटरमधील डिफॉल्टरची टक्केवारी २०१२ मध्ये ९ टक्के पासून २०१६ मध्ये १९ टक्के वाढल्याचे प्रजाने अहवालात म्हटले आहे. तर २०१६ - १७ मध्ये अतिसारामुळे जवळपास ३ पैकी १ मृत्यू होतो. त्यात चारवर्ष किंवा त्या खालील बालकाचा समावेश असतो.

Post Bottom Ad