कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी

Share This
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेचा महत्वकांक्षी असलेला मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर पासून सुरु होणार आहे. कोस्टल रोडचे काम सुरु होण्या आधीच या सागरी रस्त्याला "छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग" असे नाव देण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

कोस्टल रोड बांधण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या वचननाम्यातून दिले होते. पालिका निवडणूकीनंतर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर कोस्टल रोडला लवकरात लवकर कशी सुरुवात होईल यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्नात होते. याबाबत स्थायी समितीत प्रस्ताव आल्यावर सादरीकरणाची मागणी करण्यात आली होती. या सादरीकरणा दरम्यान कोस्टल रोडचे काम सुरु होणार असल्याचे कळताच शिवसेनेने या कोस्टल रोडला इतर कोणाच्या नावाची मागणी होण्या आधीच "छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग" असे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी सभागृह नेते यशवंत जाधव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कीर्तिकर यांच्या मागणीनुसार यशवंत जाधव यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवून याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

कसा असेल कोस्टल रोड - मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचं बांधकाम करुन एकूण ३५.६ कि.मी. लांबीच्या कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे. या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ५३०३.३४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कोस्टल रोडवर अॅम्बुलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. ही मार्गिका पावणे तीन मीटर रुंदीची असेल. कोस्टल रोडला जोडून सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच खुले प्रेक्षागृह आदींचा समावेश असेल. कोस्टल रोड प्रकल्पासाठी बीआरटीएसची स्वतंत्र मार्गिका असेल, तसेच वाहनतळाचीही सुविधा असेल. त्यामुळे नागरिकांसाठी उत्तम प्रवास सुविधा या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जात आहे. हा प्रकल्प झाल्यास ३४ टक्के अर्थात ३५० टन इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी १० कोटी डॉलर्सची बचत होणार आहे.

कोस्टल रोडचा मार्ग - प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क बोगदे
अमरसन उद्यान जोडरस्ता
हाजीअली जोडरस्ता
वांद्रे- वरळी सागरी सेतू जोडरस्ता (दक्षिण वरळी)
वांद्रे- वरळी सागरी सेतू जोडरस्ता (वरळी)
कार्टर रोड जोडरस्ता
रितूंभरा महाविद्यालय जोडरस्ता
मढ बेट जोडरस्ता
ओशिवरा जोडरस्ता
मालाड जोडरस्ता
कांदिवली जोडरस्ता

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages