महापालिकेकडून रोज 7 झाडांना कापण्याची परवानगी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2017

महापालिकेकडून रोज 7 झाडांना कापण्याची परवानगी


3 वर्षात एकूण 7842 झाडे कापली -
मुंबई / प्रतिनिधी -
महाराष्ट्र शासन 4 कोटी झाडे लावण्याचा विक्रम करण्यासाठी मैदानात उतरली असताना मुंबई महानगरपालिका मात्र दररोज 7 झाडांना कापण्याची परवानगी देत असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेच्या उद्यान खात्याने दिली आहे. विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्याच्या कामात जास्त रस घेतला जातो. पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती मनात येईल तेव्हा झाडे कापण्याची परवानगी देत असल्यामुळे ग्रीन मुंबई चळवळीस ही बाब घातक आहे. त्यासाठी झाडे तोडण्यासाठी अर्ज येईल तेव्हा वृक्ष प्राधिकरण समितीच्या बरोबर स्थानिक नागरिकांना निरीक्षणासाठी आमंत्रित करावे जेणेकरुन विनाकारण झाडे तोडण्याचा प्रकार बंद होईल अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या उद्यान खात्याकडून गेल्या 3 वर्षात पालिकेने झाडे कापण्यासाठी दिलेल्या परवानगीची माहिती मागितली होती. पालिकेच्या उद्यान उप अधीक्षकांनी अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार 2014, 2015 आणि 2016 या तीन वर्षात 3 वर्षात एकूण 7842 झाडे कापली गेली. 13070 झाडे पुर्नरोपित केली गेली तर 28787 झाडे राखली गेली. 3 वर्षात सर्वात जास्त 3819 झाडे वर्ष 2016 या वर्षात कापली गेली. यात 1830 खाजगी, 1448 शासन आणि 2541 पालिकेने विविध कामासाठी कापली आहे. त्यानंतर 2720 झाडे वर्ष 2015 आणि 1303 झाडे वर्ष 2014 कापली गेली आहेत. गेल्या 3 वर्षात एकूण 13070 झाडे पुर्नरोपित केल्याचा दावा केला आहे. वर्ष 2015 या वर्षात सर्वात जास्त 5054 झाडे खाजगी, शासन आणि पालिकेने पुर्नरोपित केली आहे. 2016 या वर्षात ही संख्या कमी होत 3770 इतकी झाली आहे. तसेच पालिकेने गेल्या 3 वर्षात एकूण 49060 झाडांचे वृक्षारोपण केल्याचाही दावा केला आहे. 2014 मध्ये 14253, 2015 मध्ये 16157 तर 2016 मध्ये 18650 झाडे वृक्षारोपण केली आहेत.

Post Bottom Ad