आज मध्यरात्रीपासून बेस्टचा संप सुरु - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आज मध्यरात्रीपासून बेस्टचा संप सुरु

Share This

बेस्टला मुख्यमंत्र्यांकडूनही दिलासा नाही -
संप रोखण्यास शिवसेना भाजपा अपयशी -

मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईकर नागरिकांची लाईफलाईन असलेल्या बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यात मुंबई महापालिका व राज्य सरकार अपयशी ठरल्याने कर्मचाऱ्यांच्या युनियन ने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे रविवारी (६ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. ७ ऑगस्ट या बेस्टच्या ७० व्या वर्धापन दिनी संप पुकारला असताना पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी भाजपाला हा संप रोखण्यात अपयश आले आहे. शिवसेना आणि भाजपाला हा संप रोखण्यात अपयश आल्याने सोमवारी कामानिमित्त व रक्षाबंधन निमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार आहेत.

बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसर्‍या दिवशी करावा, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, महापालिकेने बेस्टला दिलेले कर्ज अनुदान जाहीर करावे, पालिका आकारत असलेल्या विविध करातून सूट मिळावी, बेस्ट उपक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेने घ्यावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्टच्या १२ युनियनच्या कृती समितीने मंगळवार पासून उपोषण सुरु केले होते. तीन दिवस उपोषण सुरु असले तरी महापालिका किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने संपकर्‍यांची भेट घेतली नव्हती. याच दरम्यान उपोषणकर्त्यां युनियन पदाधिकाऱ्यांची प्रकृती खालावत चालल्याने गुरुवारी हे उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण मागे घेताना ६ ऑगस्टआधी निर्णय न घेतल्यास ६ ऑगस्टच्या मध्यरात्री पासून संपावर जाण्याचा इशारा कृती समितीकडून देण्यात आला होता.

पालिका आयुक्तांनी बेस्टला कृती आराखडे देण्यापलीकडे आर्थिक मदत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सकारात्मक भूमिका घेतली नव्हती. आयुक्त सकारात्मक भूमिका घेत नसताना त्यांच्यावर दबाव टाकण्यात पालिकेतील सत्ताधारी शिवसेना अपयशी ठरली. आयुक्त शिवसेनेचे ऐकत नसल्याने महापौरांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारखेला देण्यात यावा असे आदेश बैठकीत आयुक्तांना दिले. त्याला आयुक्तांनी तयारी दाखवली आहे. राज्य सरकारकडूनही हवी ती मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. मात्र आयुक्तांवर कोणत्याही कर्मचारी युनियनचा विश्वास नसल्याने लेखी आश्वान देण्याची मागणी करण्यात आली. आयुक्तांकडून असे लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्याने ठरल्या प्रमाणे संपाची हाक देण्यात आली आहे. आयुक्त लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे कर्मचारी कृती समितीकडून सांगण्यात आले आहे.

बेस्ट युनियनने संप मागे घ्यावा - महापौर
मुख्यमंत्र्यांची बेस्ट संपा बाबत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारखेला देण्यात यावा अशी भूमिका बैठकीत मांडली त्याला आयुक्तांनी तयारी दाखवली आहे. राज्य सरकार कडून हवी ती मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. 10 तारखेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार महापालिका प्रशासन आणि बेस्ट देणार. बेस्ट कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली. लेखी पत्र मागणे हे कामगार संघटनांचे काम आहे. संप मागे घ्यावा अशी आम्ही मागणी केली आहे. संप करून बेस्ट आर्थिक तोट्यातून बाहेर येणार नाही.
विश्वनाथ महाडेश्वर - महापौर, मुंबई

आयुक्तांवर आमचा विश्वास नाही - 
कर्मचाऱ्यांची सर्वस्व जबादारी महापालिका घेत नाही तोपर्यंत संप सुरू राहील. कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी ऍग्रिमेंट नुसार पगार यायला हवा. 10 तारखेला पगार होईल या आयुक्तांच्या शब्दावर आमचा विश्वास नाही. लेखी आश्वासन आयुक्तांनी दिले तर कृती समितीची बैठक घेऊ. आयुक्तांना बेस्टचे खाजगीकरण करायचे आहे. बेस्टचे 36 हजार कामगार संपावर जाणार. शिवसेनेची कर्मचारी युनियन ही संपात सहभागी होणार आहे. आयुक्त लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत संप सुरू राहील.
शशांक राव - युनियन नेते / कृती समिती

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages