
उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी आयुक्तांवर -
मुंबई / प्रतिनिधी - बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पालिकेने आर्थिक मदत करावी व बेस्टला पालिकेत सामावून घ्यावे या मागण्यांसाठी आज मंगळवार पासून वडाळा येथील डेपोबाहेर कर्मचारी युनियन पदाधिकारी व सदस्य बेमुदत उपोषणाला बसले आहेत. बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांच्यासह कृती समितीमधील १२ संघटनांचे पदाधिकारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. बेस्ट कर्मचारी साखळी उपोषण करत आहेत. बेस्टला दिलासा देण्यात पालिका अपयशी ठरत असल्याने हे उपोषण पालिका आयुक्त दिलासा देत नाहीत तो पर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी दिली.
बेस्टला दिलासा द्यावा बेस्ट आर्थिक तोट्यातून बाहेर काढावी म्हणून महापौरांच्या अध्यक्षतेखाली ५ बैठका संपन्न झाल्या. यासर्व बैठकांमध्ये कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. बेस्टला २ हजार कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली जात असताना हि मागणी पूर्ण करण्याऐवजी पालिका आयुक्तांनी बेस्टच्या तिकिटांच्या दरामध्ये बदल, बेस्टच्या रूटमध्ये सुसूत्रता आणणे, जास्त प्रवासी असलेल्या ठिकाणी जास्त बस गाड्या तर कमी प्रवासी असलेल्या ठिकाणी कमी बस गाड्या चालवणे, बेस्ट कर्मचाऱ्यांचे भत्ते पालिका कर्मचाऱ्यांइतके करणे, बेस्टमध्ये नव्याने भरती न करता आहे त्याच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे अश्या सूचना केल्या आहेत. बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नसल्याने कर्मचारी नाराज आहेत. यामुळे बेस्टला पालिकेत सामावून घ्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांकडे होणाऱ्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. पालिकेकडून दिलासा देईल असे कोणत्याही प्रकारचे चित्र दिसत नसल्याने येणाऱ्या काळात आयुक्त आणि पालिका प्रशासनाकडून बेस्टला दिलासा दिला जाईल याची शक्यता नसल्याने आज पासून उपोषण सुरु करण्यात आले आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीत बेस्ट सोबत आहोत. उपोषणामुळे बेस्ट बंद होऊन नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कर्मचारी फक्त साखळी उपोषण करत आहेत. हे उपोषण कधी पर्यंत सुरु राहावे हे पालिका आयुक्तांनी ठरवावे. पालिका आयुक्तांनी या उपोषणाकडे दुर्लख केल्यास १० ऑगस्टला होणाऱ्या पुढील बैठकीपर्यंत उपोषण सुरूच राहील. या उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी पालिका आयुक्तांवर असेल असे सुहास सामंत यांनी सांगितले.
