
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेमधून महिला प्रवाश्यांबरोबर अशील चाळे होत असल्याने महिला प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाश्याना सुरक्षित प्रवास देण्याकडे लक्ष दिले जाणार असल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली. बेस्टच्या ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ७० व्या वर्धापन दिनाची माहिती देताना कोकीळ बोलत होते.
यावेळी बोलताना बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने ५९० कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. पालिकेने हा अर्थसंकल्प रद्द केला असला तरी पालिकेने हि आर्थिक तूट भरून काढावी म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहेत. पालिकेने आपल्या बजेटमध्ये बेस्टला आर्थिक मदत करण्यासाठी तरतूद करावी अशी मागणी कोकीळ यांनी केली. बेस्टच्या उत्पन्न वाढीसाठी डेपो मधील कर्मचारी माईक आणि लाऊडस्पीकर द्वारे प्रवाश्याना बस बद्दल माहिती देऊन प्रवाश्यांची संख्या वाढवली जात आहे.प्रवासी वाढवण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत असताना डेपो किंवा बस थांब्या जवळ असलेल्या रिक्षा टॅक्सी सारख्या वाहनांवर कारवाई करतांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याची खंत कोकीळ यांनी व्यक्त केली आहे. बेस्टच्या १७ डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचा विरोध असलेले कॅनेडियन शेडूल्ड बंद मॅन्युअली वेळापत्रक सुरु झाल्याची माहिती कोकीळ यांनी दिली.
आर्थिक तोट्यात चाललेल्या ‘बेस्ट’ला वाचवण्यासाठी दिग्गज मराठी कलाकार धावून आले आहेत. ‘बेस्ट’च्या गाड्यांमधून सुरक्षित प्रवास करा, ‘बेस्ट’ची वीज वापरा असा संदेश हे कलाकार देणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन कलाकार स्विकारणार नाहीत. यामध्ये अभिनेता प्रशांत दामले, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, अविनाश नारकर, अतुल तोडकर, शीतल शुक्ल, आदेश बांदेकर, अमोल कोल्हे, सुबोध भावे यांच्यासारखे कलाकार ‘बेस्ट’ ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून काम करणार आहेत. हे कलाकार बेस्ट दिनानिमित्त हजर राहणार असून त्याची घोषणा रविंद्रनाथ नाट्यमंदिर येथील कार्यक्रमात केली जाईल. ६ व ७ ऑगस्ट दरम्यान रविंद्रनाथ नाट्यमंदिर येथे बेस्टमधील ऐतिहासिक वास्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती कोकीळ यांनी दिली.
पेंग्विन कक्ष इमारतीत बेस्टचे वस्तूसंग्रहालय -
भायखळा राणीबाग येथील पेंग्विन कक्ष बनवलेल्या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर मोकळी जागा आहे. हि जागा बेस्टच्या वस्तू संग्रहालयाला द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. बेस्टचे सध्या आणिक डेपो येथे वस्तू संग्रहालय आहे. हे संग्रहालय राणीबाग मधील पेंग्विन कक्षात बनवावा असा प्रस्ताव पालिकेला दिला आहे.
अनिल कोकीळ, अध्यक्ष - बेस्ट समिती
