
मुंबई / प्रतिनिधी - इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश नामांकित शाळा आपल्याच शाळेतील नर्सरी, केजीच्या विद्यार्थाना पाहिलीत प्रवेश देत असतात. यामुळे इतर विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश घेताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. याकारणाने अश्या शाळांमधील नर्सरी, केजीमध्ये विद्यार्थ्यांना नाईलाजाने लाखो रुपये खर्च करून प्रवेश घ्यावा लागत आहे. अश्या नर्सरी, केजीचे वर्ग चालवण्यास राज्य सरकारच्या किंवा पालिकेच्या शिक्षण विभागाची परवानगी नसतानाही शाळा मात्र करोडोंची कमाई करत असल्याचा आरोप सत्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नफीस खान यांनी केला आहे. दरम्यान याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती खान यांनी दिली आहे.
याबाबत राज्य सरकारच्या व मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सरकार व पालिकेने नर्सरी, केजीचे वर्ग चालवण्यासाठी परवानगी दिलेली नाही. असे असताना अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनुदानप्राप्त असल्यामुळे पहिलीतील प्रवेशासाठी नाममात्र शुल्क घेत आहेत. मात्र नर्सरी, केजीच्या प्रवेशासाठी दोन ते तीन वर्षाकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे लाखभर रुपये उकळत आहेत. या माध्यमातून अश्या शाळांना वर्षाकाठी करोडो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने शाळेबाहेरील विद्यार्थ्यांना पाहिलीत प्रवेश नाकारला जात असल्याची माहिती खान यांनी दिली आहे.
याबाबत खान यांनी घाटकोपर केव्हीके सार्वजनिक स्कुल आणि नॉर्थ मुंबई वेल्फेअर सोसायटी स्कुल या शाळांमधील हा घोटाळा पुराव्यानिशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडला आहे. अश्या शाळा मुंबईकर नागरिकांची लूट करत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. प्राथमिक शिक्षण विभाग मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असल्याने हे प्रकरण पालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांच्याकडे चौकशीकडे आले आहे. पालकर यांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी शाळांमधून चालणाऱ्या नर्सरी, केजीच्या वर्गांवर पालिकेचा अंकुश नाही. शिक्षण अधिकारी पालकर यांच्याकडून कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याने नर्सरी घोटाळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा खान यांनी दिला आहे.