मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईचा सन २०१४ ते २०३४ या २० वर्षाचा विकास आराखडा सभागृहातील प्रदीर्घ चर्चेनंतर मंजुर करण्यात आला आहे. हा आराखडा मंजूर करताना मुंबईमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरे १४ ते १५ लाखांत उपलब्ध होतील तसेच ८० लाख नोकर्या निर्माण होणार आहेत. दरडोई मोकळी जागा चार पटींनी वाढणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. विकास आराखडा मंजूर करण्याअगोदर पालिका आयुक्तांनी सभागृहाला हि माहिती दिली.
मुंबईच्या महत्त्वाकांशी विकास आराखड्याबाबत नगरसेवक, गटनेत्यांनी मांडलेल्या हरकती-सूचनांवर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलताना विकास आराखड्यात दाखवण्यात आलेल्या परवडणार्या घरांबाबत बोलताना मीठागरांसारख्या नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये विकास आराखड्यात दाखवण्यात आलेल्या आरक्षित जागेवर ही परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे महापालिकेला ‘झिरो कॉस्ट’मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ज्यांना घरे नाहीत अशा गोरगरीबांना ही घरे १४ ते १५ लाखांत उपलब्ध करता येतील. हे पैसेदेखील त्या त्या विभागात नागरी सुविधा देण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत दरडोई मुंबईत उपलब्ध असणारी १ चौ.मी. असलेली मोकळी जागा विकास आराखड्यात ४ चौ. मी. होणार आहे. स्किल सेंटरमुळे लाखो रोजगार निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी १४ लाख कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी ४ ते ५ हजार कोटी प्रत्येक बजेटमध्ये तरतूद केली जाणार आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी यावर्षीच्या बजेटमध्ये २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पार्किंगसाठी खासगी संस्थांचे सहाय्य घेणार आहे. मॅनग्रोव्ह नॅचरल एरिया जाहीर करणार आहे, त्या ठिकाणी कधीही कोणताही विकास होणार नाही, प्रत्येक वॉर्डमध्ये प्रस्थापितांसाठी राखीव जागा ठेवली जाणार आहे. मुंबईचे वैभव असलेल्या हेरिटेज वास्तूंना धक्का लावणार नाही, ठाणे क्रीक खाडीत १४.९६ हेक्टर जागा उपलब्ध होणार असून ही जागा नॅचरल एरिया म्हणून आरक्षित ठेवणार असल्याची माहिती मेहता यांनी दिली आहे.