निकाल लावण्यास अपयशी ठरलेल्या मुंबई विद्यापीठाला काँग्रेसचा २ ऑगस्टला घेराव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2017

निकाल लावण्यास अपयशी ठरलेल्या मुंबई विद्यापीठाला काँग्रेसचा २ ऑगस्टला घेराव


कुलगुरू, शिक्षण मंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा – संजय निरुपम
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी ३१ जुलै पर्यंत सर्व निकाल जाहिर करू असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही अनेक परीक्षांचे निकाल रखडलेले आहेत. विद्यापीठातील परिस्थिती बिकट झाली असून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल लावताना मुंबई विद्यापीठ संपूर्णतः नापास झालेले आहे, त्यामुळे कॉंग्रेसतर्फे बुधवार, २ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता कालिना येथील मुंबई विद्यापीठाला घेराव घालणार असल्याची माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

संजय निरुपम पुढे म्हणाले की मुंबई विद्यापीठाच्या १६० वर्षाच्या काळात पहिल्यांदा असे घडले आहे की अनेक परीक्षाचे सर्व निकाल रखडलेले आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार ४५ दिवसात निकाल लागणे अपेक्षित आहे परंतु अनेक महिने झाले तरी हि अजून विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले नाहीत. अनेकांना विदेशात शिकायला जायचे होते, नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचे होते परंतु संपूर्ण घोटाळा करून ठेवलेला आहे. हे असे भाजपा सरकारच्या काळातच घडू शकते. याला सर्वस्वी कुलगुरू संजय देशमुख जबाबदार आहेत, त्यांच्या जिद्दी मुळे हे सगळे घडलेले आहे. या सर्व निकालांची जबाबदारी मेरीट ट्रॅक कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीमध्ये भाजपाचे काही मोठे नेते गुंतलेले आहेत. या भाजपा नेत्यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळेच मेरीट ट्रॅक कंपनीला जाणून बुजून काम देण्यात आले होते. हा एक खूप मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. यासाठी माजी न्यायाधीशांची उच्च स्तरीय समिती नेमावी आणि सखोल चौकशी करावी, या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून कुलगुरू संजय देशमुख व शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांनी त्वरित राजीनामा द्यावा अश्या मागण्या निरुपम यांनी केल्या आहेत. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने घेरावात सहभागी व्हावे असे आवाहन निरुपम यांनी केले आहे.

Post Bottom Ad