
मुंबई / प्रतिनिधी -
घाटकोपर येथील सिद्धी साई इमारतीच्या दुर्घटनेची घटना ताजी असताना कुर्ला पश्चिम येथील शीतल इमारतीत अशाच दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. शीतल बार आणि रेस्टॉरंटने तसाच काही प्रकार केल्यामुळे शीतल सिनेमा इमारत पालिकेने रिक्त केली पण ठोस कार्यवाहीच्या केली नसल्याने शीतल बार आणि रेस्टॉरंट सुरुच असल्याने घाटकोपर घटनेची पुनरावृत्ती कुर्ल्यात होण्याची शक्यता आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे.
कुर्ला पश्चिम एलबीएस मार्गावर शीतल सिनेमा असून तळमजला येथे एक उपहारगृह तसेच बार रेस्टॉरंट चालते. 27 जून 2017 रोजी इमारतीचा एक भाग कोसळताच पालिका, फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी इमारत खाली करत तेथे सील ठोकले. सिनेमा गृहात नेहमीच गर्दी असून भोजपुरी सिनेमासाठी शीतल सिनेमा प्रसिद्ध आहे. शीतल सिनेमा आणि उपहारगृह ताबडतोब बंद झाले पण शीतल बार आणि रेस्टॉरंट सुरुच आहे. शीतल बार आणि रेस्टॉरंटने आपल्या भागातील काही भागात केलेल्या बदलामुळे इमारतीस धोका निर्माण झालेला आहे. कुर्ला एल पालिकेच्या विनंतीवरुन आर्किटेक शशांक मेहंदले यांनी सर्वे करत सदर इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला तर बॉम्बे आयआयटीने दिलेल्या अहवालात या इमारतीस सी1 प्रवर्गात मोडत ताबडतोब खाली करण्याचा अहवाल दिला. अशी परिस्थिती असताना ही इमारत संपूर्ण रिक्त करत तोडण्याची गरज आहे कारण या इमारतीच्या लगत छत्रपती शिवाजी महाराज तलाव असून लाखो भाविक गणेशोत्सव दरम्यान या ठिकाणी येतात. बार आणि रेस्टॉरंट ताबडतोब खाली करत स्वतःच्या फायदासाठी लोकांच्या जीवाशी खेळत अश्या प्रसंगी सहकार्य न करणाऱ्या लोकांविरोधात पोलीस कार्यवाहीची आवश्यकता आहे. याबाबीची तक्रार आरतीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची असून पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून ताबडतोब कार्यवाहीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.